किंग्स्टन (जमैका) - भारत आणि वेस्ट इंडिजच्या संघांमध्ये दुसरा कसोटी सामना किंग्स्टन येथे सुरू आहे. दरम्यान, जमैका येथील भारतीय उच्चायुक्तांनी भारतीय संघाला मेजवानीसाठी बोलावले होते. या मेजवानीनंतर बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरून भारतीय संघाचा जमैकास्थित भारतीय उच्चायुक्तांसोबतचा फोटो शेअर केला होता. मात्र या फोटोमध्ये कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही वेस्ट इंडिजमध्ये असूनही न दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, अनुष्का शर्मा ही कॅरेबियन बेटांवर असून, ती या कार्यक्रमास उपस्थित होती. मात्र संघाच्या ग्रुप फोटोमध्ये ती नसण्याचे कारण आता समोर आले आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना भारतीय संघाला इंग्लंडमध्ये भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी डिनरसाठी बोलावले होते. त्यावेळी काढण्यात आलेल्या सामूहिक फोटोमध्ये कर्णधार विराट कोहलीसोबत अनुष्का शर्माही दिसली होती. त्यावरून मोठा वादंगही झाला होता. तसेच या विषयावरून विराट आणि अनुष्काला ट्रोलही करण्यात आले होते. त्यामुळे यावेळी भारतीय उच्चायुक्तालयातील कार्यक्रमास उपस्थित असूनही अनुष्काने भारतीय संघ आणि उच्चायुक्तांच्या ग्रुप फोटोमध्ये दिसणे टाळले.