नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ चार महिन्यांचा इंग्लंड दौरा करीत आहे. त्यासाठी २ जून रोजी खेळाडू लंडनकडे रवाना झाले. खरेतर डब्ल्यूटीसी फायनल १८ ते २२ जून या काळात खेळली जाईल. त्यानंतर थेट ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध मालिकेला प्रारंभ होणार. मग खेळाडू मधल्या काळात करतील तरी काय, असा चाहत्यांना प्रश्न पडला. डोके खाजवूनही उत्तर सापडत नव्हते. पण खरे कारण कर्णधार विराट कोहलीने सांगितले.
शारीरिक कार्यभाराप्रमाणे मानसिक भार आणि त्याचे योग्य व्यवस्थापन हा खेळाचा भाग असतो. खेळाशिवाय दुसरा विचार करायला खेळाडूकडे वेळ नसेल तर त्याच्या कामगिरीवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. कोरोनामुळे ‘मैदान आणि हॉटेलची खोली’इथपर्यंत जग मर्यादित झाले. त्यात कुटुंबीयांपासून दूर असल्याचा ताण वेगळा. यामुळे अतिरिक्त मानसिक ताण येतो. बायोबबलमधील वास्तव्याचा फटका क्रिकेट, टेनिस आणि फुटबॉल खेळाडूंना बसला. काहींनी खेळातून माघारही घेतली.
भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये खेळल्यानंतर आयपीएलचे उर्वरित सामने आणि त्यानंतर टी-२० विश्वचषक खेळतील. दरम्यान, भारताचा आणखी एक संघ श्रीलंका आणि बांगला देशचा दौरा करणार आहे. विराटने इंग्लंडमधील ‘ब्रेक’चे स्वागत केले.
- विराटच्या मते,‘विश्रांतीमुळे संघाची ‘लय’ बिघडण्याची शक्यता नाही. मोकळ्या वेळेचा आम्ही सदुपयोग करू, शिवाय तयारीवर नजर असेल. स्वत:ला ताजेतवाने ठेवणे आणि खेळावर फोकस करण्याची ही उत्कृष्ट संधी असेल.
- इंग्लंडमध्ये आम्ही खेळापासून स्वत:ला दूर ठेवणार आहोत. पाच कसोटी सामन्याचे दडपण, बायोबबलमधील वास्तव्य या गोष्टी थोड्या वेळासाठी डोक्यातून काढून टाकू.
- बाहेर जाण्याची संधी मिळणार असल्यामुळे आम्ही कुटुंबीयांना सोबत आणले आहे. स्वत:ला वेळ दिल्यानंतर पाच सामन्याच्या दीर्घ मालिकेत शानदार कामगिरी करण्यास सज्ज होऊ.’
ज्या माहोलमध्ये सर्व जण आहोत, असेच सुरू राहिले तर मानसिक आरोग्य खराब होईल. भविष्यात मानसिक आरोग्य सांभाळणे मोठे आव्हान असेल. मैदान आणि हॉटेल यादरम्यान क्रिकेटशिवाय इतर बाबींचा विचार करायला वेळ मिळत नाही. आम्ही व्यस्त वेळापत्रकातून जात असताना खेळाडूंवर मानसिक दडपण यावे, हे मला पसंत नाही. खासगी आयुष्य फुलविण्यासाठी प्रत्येकाकडे स्वत:साठी वेळ असायला हवा.
- विराट कोहली
Web Title: ... So the cricketers lived in England for four months, mental health management is important - Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.