मुंबई - भारत आणि न्यूझीलंडमध्ये आजपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना रंगणार असून क्रिकेटचाहत्यांबरोबर कर्णधार विराट कोहलीसाठी सुद्धा हा सामना खास असणार आहे. कारण विराटच्या क्रिकेट करीयरमधील हा 200 वा एकदिवसीय सामना आहे. विराट आज हा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरेल त्यावेळी त्याचा एका खास क्लबमध्ये समावेश होईल. एक नजर विराट कोहलीच्या करीयर ग्राफवर.
- 200 वा वनडे सामना खेळणारा विराट जागतिक क्रिकेटमधील 71 वा क्रिकेटपटू आहे.
- विराटने आतापर्यंत खेळलेल्या 199 वनडे सामन्यात 8767 धावा केल्या आहेत.
- कोहलीने 199 सामन्यात 30 शतके आणि 45 अर्धशतके झळकावली आहेत.
- कोहलीच्या नावावर 818 चौकार आणि 95 षटकार आहेत.
- शतकांमध्ये कोहली ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगसोबत दुस-या स्थानावर आहे. पाँटिंगची सुद्धा 30 शतके आहेत पण त्यासाठी पाँटिंग 375 सामने खेळला.
- 200 एकदिवसीय सामने खेळणा-या क्रिकेटपटूंमध्ये धावांच्या सरासरीमध्ये कोहली पहिल्या स्थानावर आहे. कोहली 55.13 च्या सरासरीने धावा करत आहे.
- 200 सामने खेळणा-या क्रिकेटपटूंमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डिव्हिलियर्सने 54.25 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
- 200 पेक्षा जास्त सामने खेळून 50 पेक्षा जास्त सरासरी ठेवणारे चार क्रिकेटपटू आहेत. त्यात महेंद्रसिंह धोनी, डिव्हिलियर्स, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल बेवन आणि विराट कोहलीचा समावेश होतो.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8 हजार धावा पूर्ण करणा-या क्रिकेटपटूंमध्ये धावांच्या सरासरीच्या बाबतीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे.
- 200 वा एकदिवसीय सामना खेळणारा विराट कोहली भारताचा 13 वा क्रिकेटपटू आहे.
- कोहलीच्या कर्णधारपदाखाली भारताची विजयाची टक्केवारी 79.48 आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आतापर्यंत 40 एकदिवसीय सामने खेळला आहे. त्यात 31 मध्ये विजय तर, आठ सामन्यांमध्ये पराभव झाला.