लंडन : इंग्लंडचा दिग्गज खेळाडू केव्हीन पीटरसनने एक ट्वीट करुन कसोटी क्रिकेटच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये पीटरसन म्हणतो, माझ्यासाठी हे लिहिणे खूप त्रासदायक ठरत आहे. पण मला हळूहळू कसोटी क्रिकेटचे अध:पतन होताना दिसते आहे. हे असेच चालत राहिले तर २०२६ साली केवळ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि शक्य झाले तर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे संघच कसोटी क्रिकेट खेळताना दिसतील. पीटरसनच्या या ट्वीटवर क्रिकेटविश्वातून अनेक प्रतिक्रिया आल्या.
या ट्वीटला उत्तर देताना एक चाहता म्हणतो की, ‘हा एक जोक आहे का? कारण तू न्यूझीलंडचे नाव विसरला आहेस. त्यांनी नुकतेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.’ दुसरा एकजण म्हणाला, ‘पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या मायदेशात जाऊन हरवले होते. तरी तू पाकिस्तानबाबत साशंक आहेस.’ तर काहींच्या मते, ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा मालिका सुरु झाल्या तर त्याचा कसोटी क्रिकेटला फायदा होईल.’
एक चाहता म्हणाला, ‘श्रीलंका आणि बांग्लादेशही कसोटी क्रिकेटमध्ये असतील. फक्त त्यांनी कमकुवत संघासोबत मालिका खेळणे कमी करायला हवे.’ एका क्रिकेटप्रेमीने यावर एक चांगला उपाय सांगितला आहे. तो म्हणतो, ‘आयसीसीने फुटबॉलच्या धर्तीवर कसोटी क्रिकेटसाठी आफ्रिका, युरोप आणि आशिया कप आयोजित करायला हवा.’ पीटरसनचे हे ट्वीट सध्या समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे.