UAEत Indian Premier League ( IPL 2020) ची धामधुम सुरू असताना मंगळवारी भारतीय क्रिकेटला धक्का देणारे वृत्त समोर आले. तामिळनाडूचा 35 वर्षीय फिरकी गोलंदाज प्रसंथ राजेश ( MP Rajesh) याचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. 2018मध्ये त्यानं तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण केले होते आणि LYCA कोवई किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करताना I Dream कराईकुडी कालाई संघाविरुद्ध तीन विकेट्स घेतल्या होत्या. किंग्सनं हा सामना सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी जिंकला होता.
तिरूनेलवेली येथील मैदानावर हा सुपर ओव्हरचा सामना खेळवला गेला होता आणि त्यात SRHचा गोलंदाज टी नटराजनही खेळला होता. राजेश हा कोवई किंग्स संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. त्याच्या निधनानं तामिळनाडू क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे. त्यानं तामिळनाडूच्या 19 वर्षांखालील आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.
राजेश याच्या निधनानंतर आर अश्विननं पोस्ट लिहिली. ''MP Rajesh तुला भावपूर्ण श्रद्धांजली. तू आमच्यात नाहीस यावर विश्वास बसत नाही. सामन्यानंतर आपण ज्या गप्पा मारायचो ते मी कधीच विसरणार नाही,''असे अश्विनने लिहिले.
दरम्यान, सोमवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध (Royal Challengers Banglore) अश्विनने टीच्चून मारा करत एक बळीही घेतला. दिल्लीने आरसीबीविरुद्ध ५९ धावांनी विजय मिळवला खरा, पण यावेळी चर्चा रंगली ती मांकडिंगची. यावर अश्विनने आता ट्वीटही केले असून ही शेवटची सूचना असेल, असेही सांगितले.
आरसीबीविरुद्ध गोलंदाजी करताना चेंडू फेकण्याआधीच नॉन स्ट्राईकला असलेल्या अॅरोन फिंचने क्रीझ सोडली आणि यावेळी अश्विनला मांकडिंगद्वारे फिंचला बाद करण्याची नामी संधी मिळाली. परंतु, अश्विनने त्याला बाद न करता फक्त सावध केले. याआधी २०१९ सालच्या सत्रात अश्विनने जोश बटलरला अशाच प्रकारे बाद केले होते. यानंतर क्रिकेटविश्वात नवा वादही निर्माण झाला होता. यावर आता अश्विनने ट्वीटरवर मेसेज पोस्ट केला असून, ‘यंदाच्या वर्षात अशाप्रकारे बाद करण्यासाठी ही पहिली आणि अखेरची सूचना असेल.’ असा संदेश दिला आहे.
अश्विनने ट्वीट केले की, ‘मी एक गोष्ट स्पष्ट करतो. ही २०२० वर्षासाठी पहिली आणि अखेरची सूचना आहे. मी हे अधिकृतपणे सांगतोय आणि यानंतर मला दोषी ठरवू नका.’ या मेसेजसोबत अश्विनने दिल्ली प्रशिक्षक रिकी पाँटिंगला टॅग केले असून त्याने प्रशिक्षक पाँटिंगला इशाराच दिला आहे. कारण, यंदा मांकडिंग न करण्याबाबत पाँटिंगने अश्विनला सांगितले होते. त्याचबरोबर, ‘अॅरोन फिंच आणि मी चांगले मित्र आहोत,’ असेही अश्विनने म्हटले आहे.