मुंबई : जर भारतीय संघाला स्टिव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांना लवकर बाद करता आले नाही तर यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवता येणार नाही, असे आॅस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू इयान चॅपेलनी म्हटले आहे.चॅपेल म्हणाले, ‘कोरोना व्हायरस महामारीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्यानंतर जर ही मालिका खेळल्या गेली तर या दोघांच्या उपस्थितीचा ऑस्ट्रेलियाला नक्की लाभ होईल. मला या मालिकेची प्रतीक्षा आहे. ही मालिका रंगतदार होईल. भारताने यापूर्वीच्या दौºयात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असेल.’
चॅपेल पुढे म्हणाले, ‘यावेळी भारतापुढे खडतर आव्हान राहील. कारण स्मिथ व वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघात असतील. भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील वातावरणात चांगले खेळण्यास सक्षम आहे.’ भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१८-१९ मध्ये आॅस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात वॉर्नर व स्मिथ नव्हते. कारण हे दोन्ही खेळाडू चेंडू छेडछाड प्रकरणामुळे निलंबनाची शिक्षा भोगत होते. चॅपेल म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करणे कठीण आहे. त्यांच्याकडे शानदार गोलंदाजी आक्रमण आहे. स्मिथ व वॉर्नरला लवकर बाद केले तरच भारतीय संघ जिंकू शकतो.’ दरम्यान, क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात खेळणाºया खेळाडूंची चर्चा केली तर सध्या कोहली सर्वश्रेष्ठ आहे, असेही चॅपेल म्हणाले.