कोलकाता : ‘सौरव गांगुलीच्या काळापासून संघात बदल होण्यास सुरुवात झाली आणि विद्यमान संघाने कसून मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर ती वाटचाल पुढे कायम राखली,’ अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिली. बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव ४६ धावांनी विजय मिळविल्यानंतर तो बोलत होता. गुलाबी चेंडूने देशात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवत भारताने मालिका २-० ने जिंकली. भारताने यापूर्वी इंदूरमध्ये मालिकेतील पहिल्या लढतीत एक डाव १३० धावांनी विजय मिळवला होता.कोहली म्हणाला,‘कसोटी क्रिकेट मानसिक युद्धाप्रमाणे असते. त्यात कायम राहण्यासाठी लढवय्या बाणा असणे आवश्यक असते. याची सुरुवात दादाच्या (सौरव गांगुली) नेतृत्वाखालील संघाने झाली होती. स्वत:वर विश्वास असणे यशाचे रहस्य आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास यावर आम्ही बरीच मेहनत घेतली आहे.’ भारताचे वेगवान गोलंदाज शानदार फॉर्मात आहेत. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत ईशांत शर्मा, मोहम्मद शमी व उमेश यादव या त्रिकुटाने दुसºया कसोटी सामन्यात सर्व फलंदाजांना माघारी परतवले. कोहली म्हणाला की, ‘स्वत:वर विश्वास असल्यामुळे मायदेशात वेगवान गोलंदाज यशस्वी ठरत आहेत. ते कुठल्याही परिस्थितीमध्ये बळी घेऊ शकतात.’कोहली पुढे म्हणाला, ‘विदेशात खेळतानाही आम्हाला चांगली कामगिरी करण्याचा विश्वास असतो. ते सध्या जशी गोलंदाजी करीत आहेत त्यावरुन ते कुठेही बळी घेऊ शकतात. फिरकीपटूंसाठाही हीच बाब आहे. ते विदेशात बळी घेण्याबाबत विचार करतात. आम्ही मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी सज्ज असतो आणि त्याचा आनंद घेतो.’ (वृत्तसंस्था)सामन्यादरम्यान तीन दिवस स्टेडियममध्ये गर्दी होती. कोहलीने प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले. कोहली म्हणाला,‘संख्या वाढत गेली हे शानदार होते. रविवारी एवढी गर्दी होईल, याचा आम्ही विचार केला नव्हता. कसोटी सामन्यांचे स्थळ मर्यादित असण्याचे हे उत्तम उदाहरण आहे, याचा मी पुन्हा उल्लेख करतो.’पहिल्या डावात २२ धावात ५ आणि दुसºया डावात ५६ धावात ४ बळी घेत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेला ईशांत शर्मा म्हणाला की, ‘गुलाबी चेंडूने सुरुवातीला अडचण भासली होती. गेल्या लढतीत आम्ही चेंडूचा टप्पा पुढे ठेवण्यास प्रारंभ केला. मी व माझ्या गोलंदाजी प्रशिक्षकाने याबाबत चर्चा केली होती. गुलाबी चेंडूने गोलंदाजी करणे थोडे कठीण आहे. सुरुवातीला चेंडू स्विंग होत नव्हता, पण आम्ही परिस्थितीसोबत जुळवून घेतले.’‘भारताच्या यशात सांघिक खेळ’कोलकाता : ‘भारतीय गोलंदाजांनी सांघिक प्रयत्नांच्या जोरावर बळी मिळविण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजी आक्रमक झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली.ईडन गार्डन्सवर भारताच्या सहज विजयानंतर प्रतिक्रिया देताना शास्त्री म्हणाले,‘शिस्त व विजयाची भूक यामुळे हे शक्य झाले. एकमेकांचे समर्थन करणे आणि सांघिक गोलंदाजी करणे किती महत्त्वाचे आहे, याची भारतीय गोलंदाजांना चांगली कल्पना आहे. त्यामुळे ते वर्चस्व गाजवतात आणि बळी घेतात. आपला संघ कदाचित जगातील सर्वोत्तम संघ आहे, याची त्यांना कल्पना आहे.’शास्त्री पुढे म्हणाले, ‘आम्ही युनिट म्हणून गोलंदाजी करीत आहोत. एक भारतीय म्हणून आपल्या खेळाडूंना व्यावसायिक पद्धतीने काम करताना बघून अभिमान वाटतो. त्यासाठी वेळ लागला. गेल्या १५ महिन्यांमध्ये संघाने विदेशात बरेच क्रिकेट खेळले. त्यातून त्यांना बरेच काही शिकायला मिळाले.’अलीकडे भारताने दोनदा वेस्ट इंडिजमध्ये मालिका २-० (आॅक्टोबर २०१८ व आॅगस्ट २०१९) अशी जिंकली. डिसेंबर २०१८ मध्ये भारताने आॅस्ट्रेलियाला आॅस्ट्रेलियात २-१ ने पराभूत केले होते. भारताच्या सध्याच्या वेगवान गोलंदाजांनी कसून मेहनत घेतली असल्याचे सांगताना शास्त्री म्हणाले,‘ते गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र आहेत. यशासाठी शॉर्टकट नसतो, याची त्यांना कल्पना आहे. वैयक्तिक खेळाडू सामना जिंकून देऊ शकत नाही, हे सुद्धा त्यांना माहीत आहे.’ (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ...त्यामुळे कसोटीमध्ये भारताला यश - विराट कोहली
...त्यामुळे कसोटीमध्ये भारताला यश - विराट कोहली
‘सौरव गांगुलीच्या काळापासून संघात बदल होण्यास सुरुवात झाली आणि विद्यमान संघाने कसून मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर ती वाटचाल पुढे कायम राखली,’ अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिली.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 5:34 AM