ठळक मुद्देफुफ्फुसाच्या रहस्यमयी आजारामुळे घेतला निर्णयट्वेंटी-20 बिग बॅश लीगमध्ये करणार होता पदार्पणएक कसोटी, 9 ट्वेंटी-20, 29 वन डेत केले प्रतिनिधित्व
मुंबई : फुफ्फुसाच्या रहस्यमयी आजारामुळे ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जॉन हॅस्टिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मैदानावर गोलंदाजी करताना मृत्यू कधीही मिठी मारेल, ही भीती सतत त्याच्या मनात यायची. त्यामुळेच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. 33 वर्षीय हॅस्टिंगने तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. गोलंदाजी करताना त्याला सतत खोकला यायचा आणि त्यातून रक्त पडायचे. काही वर्षांपासून त्याला हा त्रास जाणवत होता आणि अनेक चाचण्या व शस्त्रक्रीया करूनही आजाराचे निदान झाले नाही. तो म्हणाला,''गोलंदाजी करतानाच मला हा त्रास जाणवतो. त्यामुळे मैदानावर सतत एक दडपण असायचे. मला गोलंदाजी करताना प्रचंड भीती वाटायची.'' पुढील महिन्यात तो ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-20 बिग बॅश लीगमध्ये पदार्पण करणार होता. पण, जर मैदानावर गोलंदाजी करताना कोसळलो, तर डॉक्टर मला वाचवू शकत नाही. म्हणून क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला, असे हॅस्टिंग म्हणाला. हॅस्टिंगने 1 कसोटी, 9 ट्वेंटी-20 आणि 29 वन डे सामन्यांत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.