न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये विजयी आघाडी मिळवल्यानंतर आता आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. ही मालिका आटोपल्यावर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी फलंदाजांना विश्रांती देण्यात आली आहे. तर हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत पराभूत झाल्यापासून रोहित शर्मा, विराट कोहली आणि के.एल. राहुल यांच्या टी-२० करिअरवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नेमकं कारण सांगितलं आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा टी-२० संघामध्ये समावेश न करण्यामागचं कारण सांगताना राहुल द्रविड म्हणाले की, वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका आणि एकदिवसीय वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धा आहेत. अशा परिस्थितीत खेळाडूंसाठी वर्कलोड महत्त्वाचं आहे. बीसीसीआयच्या नव्या धोरणानुसार यावर्षी आयपीएलदरम्यानही राष्ट्रीय क्रिकेट अकादमी खेळाडूंच्या वर्कलोडवर लक्ष ठेवणार आहे.
द्रविड यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सांगितले की, वर्कलोड मॅनेजमेंट आज खेळाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आम्ही या गोष्टींचं परीक्षण करत असतो. आम्ही वर्कलोड मॅनेजमेंटअंतर्गत टी-२० मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना विश्रांती दिली आहे. दुखापतींचे व्यवस्थापन आणि वर्कलोड मॅनेजमेंट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही जेवढं क्रिकेट खेळत आहोत. ते पाहता प्राथमिकता काय आहे ते पाहून या दोघांमध्येही समतोल साधावा लागेल. तसेच मोठ्या स्पर्धांसाठी सिनियर खेळाडू उपलब्ध राहतील, यावरही लक्ष ठेवावं लागेल.
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या योजनेमध्ये समाविष्ट असलेले खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील, कारण त्यामुळे त्यांना आपल्या टी-२० मधील कौशल्याचं आकलन करण्यास मदत मिळेल, असे द्रविड यांनी सांगितले. तसेच भारतीय संघासाठी खेळाच्या प्रत्येक प्रकारानुसार वेगवेगळे कर्णधार दिले जातील, या चर्चाही द्रविड यांनी फेटाळून लावल्या आहेत.