Join us  

क्रीडाप्रेमी कांगारुंची सामाजिक बांधिलकी

एक क्रीडाप्रेमी देश म्हणून जगाच्या पाठीवर आॅस्ट्रेलियाची ओळख आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 6:19 AM

Open in App

- उदय बिनीवाले, थेट सिडनीहूनएक क्रीडाप्रेमी देश म्हणून जगाच्या पाठीवर आॅस्ट्रेलियाची ओळख आहे. या जोडीला सामाजिक बांधिलकी जपण्यातही या देशाचे नागरिक अग्रेसर आहेत. सध्या जगभर आॅस्ट्रेलियाची चर्चा होण्याला कारणीभूत ठरलेल्या ‘बुश फायर’च्या निमित्ताने याची प्रचीती आली. दुसरीकडे, सिडनीत होणाऱ्या पहिल्या जागतिक सांघिक टेनिस स्पर्धेत २४ देशांचे अव्वल खेळाडू आपले कसब दाखविण्यास सज्ज झाले आहेत. याचा आनंद लुटण्यास कांगारू आतुर आहेतच; मात्र सोबतच त्यांना जंगलात लागलेल्या आगीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे भानदेखील आहे. येथील सामान्य नागरिक जबाबदारीने पुनर्वसनकार्यास मदत करताना सर्वत्र दिसून येतात. जागतिक सांघिक टेनिस स्पर्धेचे स्थळ असलेले सिडनी आॅलिम्पिक पार्कदेखील याला अपवाद नाही. टेनिस सेंटर परिसरात सामाजिक कार्यकर्त्यांकडे क्रीडाशौकीन मदत करताना हमखास दिसतात. विशेष म्हणजे, हे करीत असताना उपकाराची भावना त्यांच्या चेहºयावर अजिबातही दिसत नाही. क्रीडाप्रेमी कांगारुंची ही सामाजिक बांधिलकी पाहून सॅल्यूट ठोकावासा वाटतो.आॅस्ट्रेलियाला ३ महिन्यांपासून या ‘बुश फायर’ने सतावले आहे. यामुळे सध्या सिडनी आणि आजूबाजूला तापमान भयानक आहे. अनेकठिकाणी विषेशत: न्यू साऊथवेल्स परिसरात स्थिती गंभीर असून आगीमुळे निसर्ग, वन्यप्राणी, पक्षी, मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे स्थानिक सरकारने ‘अ‍ॅलर्ट’ घोषित केला आहे.शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणाºया या तापमानातदेखील टेनिस रसिकांचा उत्साह कायम आहे. लहान मुले, तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक असे सर्व वयोगटातील कांगारू विविध पोशाख परिधान करून स्टाईलमध्ये लज्जतदार खाण्याबरोबर या ऐतिहासिक टेनिस स्पर्धेचा आनंद लुटण्याच्या मानसिकतेत दिसतात. मुख्य फेरीच्या लढतींना आता सुरुवात होणार आहे. पुढे खेळातील जोश आणि लज्जत वाढणार. यासोबतच क्रीडाप्रेमी आॅस्ट्रेलियन्सचा उत्साहदेखील वाढताना दिसेल.मी पहिल्याच दिवशी सिडनी आॅलिम्पिक पार्कमधील टेनिस सेंटरकडे जाण्यासाठी आलो. ट्रेन स्टेशनमधून बाहेर पडलो, तर थेट आॅलिम्पिक पार्कमधेच प्रवेश केल्याचे पाहून सुखद धक्का बसला. आॅलिम्पिक पार्क येथेच खास ट्रेन स्टेशन आहे. या आॅलिम्पिक पार्कची निर्मिती २००० च्या आॅलिम्पिकसाठी केली होती. नंतर त्याचे रुपांतर ‘बिझनेस सेंटर’मध्ये झाले होते.आता येथे फिरताना अनेक मोठ्या बँका आणि कंपन्यांची कार्यालये आढळली. त्यामुळे कायम लोकांची वर्दळ असते.आॅलिम्पिक पार्कमध्ये प्रवेश केल्याबरोबर अप्रतिम, सुंदर, भव्य असे भाव उमटल्याशिवाय राहत नाहीत. कारणही तसेच आहे. वेगवेगळ्या खेळांसाठी बनविलेली ठिकाणे, इमारती, मैदाने परिसर आकर्षक आणि भव्य आहेत. विशेष बाब म्हणजे कमालीची स्वच्छता आणि आजूबाजूला असलेली झाडी, फुलझाडं, छोटी तळी आणि कारंजे! आधुनिक वास्तू आणि परिसररचना याला निसर्गाची साथ लाभल्याने एकूण परिसर स्वप्नवत भासतो. यामुळे सिडनी आॅलिम्पिक पार्क हे झकास पर्यटन केंद्र वाटते.