मुंबई - क्रिकेटमध्ये एका चेंडूवर जास्तीत जास्त किती धावा निघू शकतील? सात किंवा त्यापेक्षा किंचितसे अधिक. पण, एका चेंडूवर 286 धावा झालेल्या आहेत, असे तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण, हे खरं आहे. ऑस्ट्रेलियातील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असे घडले आहे. तशी कोठेही अधिकृत नोंद नसली तरी असा प्रसंग क्रिकेटच्या मैदानावर घडला आहे. हे सांगण्याचे कारण की, सोशल मीडियावर त्या सामन्याच्या संदर्भातील फोटो पुन्हा व्हायरल होत आहे. चला मग जाणून घेऊया ही रंजक कथा...
ऑस्ट्रेलियातील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरीया यांच्यातील 1894मध्ये एक सामना झाला होता. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर फलंदाजाने टोलावलेला चेंडू मैदानाच्या मधोमध असलेल्या झाडावर जाऊन अडकला. प्रतिस्पर्धी संघाने पंचांकडे चेंडू हरवल्याची घोषणा करावी, अशी विनंती केली. मात्र, चेंडू झाडावर कुठे अडकला आहे हे दिसत असताना तसे करता येणार नाही, असे पंचांनी सांगितले.
या कालावधीत फलंदाजांनी धावा काढण्याचे सत्र कायम राखले. चेंडू झाडावरून काढण्यासाठी खेळाडूंनी अनेक युक्त्या लढवल्या. काहींनी कुऱ्हाड आणून झाड तोडण्याचाही प्रयत्न करून पाहिला. पण, चेंडू त्यांना खाली पाडता आला नाही. त्यांचे हे प्रयत्न सुरू असताना फलंदाजांनी खेळपट्टीवर जवळपास 6 किलोमीटरचा पल्ला पार करताना 286 धावा धावून काढल्या. अखेरीत एका खेळाडूने बंदूकीने नेम धरून चेंडू खाली पाडला. एकाही खेळाडूने तो झेलण्याचे कष्ट घेतले नाही. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाने 286 धावांवर डाव घोषित केला. असा घडला 1 चेंडूवर 286 धावांचा विक्रम..
Inquirer & Commercial News या वृत्तपत्राच्या 2 मार्च 1894च्या अंकात ही बातमी छापून आली होती. त्यानंतर त्याच वर्षी Lowell Daily Sun यांनी हे वृत्त प्रसिद्ध केले. पण, या विक्रमाची शाहनिशा करणे अवघड आहे. त्यामुळे असे घडलेच होते, असा दावा करता येणार नाही. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद नाही. सध्या हा विक्रम गॅरी चॅम्पमॅन यांच्या नावावर आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या एका क्लब सामन्यात 1 चेंडूवर 17 धावा केल्याची नोंद आहे. भारताच्या वीरेंद्र सेहवागनेही पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत एका चेंडूवर 17 धावा कुटल्या होत्या. पाहा सेहवागची ती तुफानी खेळी..