मेलबर्न: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ तब्बल २४ वर्षांनी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. मात्र या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्येच पाकिस्तानला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नाहीत, असं ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टीम पेननं म्हटलं आहे. पुढल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळवला जाईल.
'संघातील काही खेळाडू तज्ज्ञांचा सल्ला घेतील. तर काहींना दौऱ्याबद्दल अधिकचा तपशील हवा आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास काही खेळाडू पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्यास तयार नाहीत,' असं पेननं सेन रेडिओशी संवाद साधताना सांगितलं. 'इतर देशांचे दौरे करताना असे प्रश्न निर्माण होतातच. आम्ही यावर चर्चा करू. खेळाडूंच्या मनातील प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील, त्यांच्या शंकांचं निरसन होईल अशी आशा आहे,' असं पेन म्हणाला.
२०१७ मध्ये पाकिस्तानात एक प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला होता. त्यात पेन वर्ल्ड ११ कडून खेळला होता. 'त्या दौऱ्यावेळी पुरवण्यात आलेली सुरक्षा अभूतपूर्व होती. तशी सुरक्षा मी तोपर्यंत आयुष्यात कधीही पाहिलेली नव्हती. आमच्या आसपासचे रस्ते ५ किलोमीटरपर्यंत बंद होते. डोक्यावर हेलिकॉप्टर्स घिरट्या घालत होती. दर किलोमीटर चेक पॉईंट्स होते,' अशी आठवण पेननं सांगितली.
ग्लेन मॅक्सवेल पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नाही. मार्चमध्ये मॅक्सवेल विवाह बंधनात अडकणार आहे. मार्च २०२० मध्ये मॅक्सवेलनं त्याची भारतीय प्रेयसी विनी रमणसोबत साखरपुडा केला. गेल्याच वर्षी त्यांचं लग्न होणार होतं. मात्र कोविड-१९ मुळे त्यांना विवाह सोहळा पुढे ढकलावा लागला. आता लग्न सोहळा पुन्हा पुढे ढकलण्याची मॅक्सवेलची इच्छा नाही. त्यामुळे मॅक्सवेल पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार नाही.
Web Title: Some Australia Players Might Not Be Comfortable Touring Pakistan says Tim Paine
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.