मुंबई : प्रत्येक वर्षी आयपीएलचा उदघाटन सोहळा मोठ्या दिमाखात होतो. या उदघाटन सोहळ्यात आयपीएलमधील सर्व संघांचे कर्णधार एकत्र येऊन चांगला खेळ करण्याची शपथ घेतात. पण यावेळी मात्र सर्व कर्णधार या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत, अशी माहीती पुढे येत आहे.
बीसीसीआयचे सदस्य आणि प्रशासकीय समिती यांच्यामध्ये 16 मार्चला आयपीएलबाबत बैठक होणार आहे. यापूर्वी उदघाटन सोहळ्यावर जास्त खर्च करण्यात येणार नाही, असे प्रशासकिय समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयपीएलच्या उदघाटन सोहळ्याची तारीख एका दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे.
आयपीएलला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. पण हाती आलेल्या माहितीनुसार काही संघांचे कर्णधार या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे त्यांची क्रिकेटबद्दलची शपथ उदघाटन सोहळ्याच्या एक दिवस पूर्वी म्हणजेच 6 एप्रिलला रेकॉर्ड करण्यात येणार आहे.
आयपीएलमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये होणार आहे. त्यानंतर 8 एप्रिलला कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या चार संघांमध्ये सामने होणार आहेत. त्यामुळे या चार संघांच्या कर्णधारांना उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे त्यांची शपथ 6 एप्रिलला रेकॉर्ड करून उदघाटन सोहळ्याच्या वेळी दाखवण्यात येणार आहे.