prithvi shaw post । मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. अलीकडेच मॉडेलसोबतच्या वादामुळे पृथ्वी शॉ चर्चेत आला होता. मात्र, या वादाला बराच काळ लोटला असला तरी अद्याप पृथ्वीने याबाबत जाहीरपणे काही भाष्य केले नाही. तरुण वयात भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर टीम इंडियात पुन्हा एकदा स्थान मिळवण्यासाठी पृथ्वी कसून मेहनत करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याचा संघात समावेश झाला होता, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पृथ्वी शॉने भारतीय संघात संधी न मिळाल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली होती. टीम इंडियासाठी खेळणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. या टीम इंडियासोबत मला काय साध्य करायचे आहे, याची मी यादी तयार केली असून मी संधीची वाट पाहत आहे, असे त्याने सांगितले होते. पृथ्वी शॉने आणखी म्हटले की, "ट्वेंटी-20 मध्ये परतल्यानंतर मला खूप बरे वाटले. खेळाडूंना भेटलो, त्यांच्यासोबत प्रशिक्षण घेतले. मी मजा केली. होय, मला खेळण्याची संधी मिळाली नाही पण त्यापेक्षा पुनरागमन महत्त्वाचे आहे." अशातच आता त्याने एक पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
पृथ्वी शॉची भावनिक पोस्ट सध्या आयपीएलच्या आगामी हंगामाच्या तयारीत व्यग्र असलेल्या पृथ्वीने इंस्टाग्रामवर एक भावनिक स्टोरी ठेवली आहे. त्याने स्टोरीच्या माध्यमातून म्हटले, "काही लोक तुमच्यावर तेवढेच प्रेम करतील. जोपर्यंत ते तुमचा वापर करून घेऊ शकतात. जिथे त्यांचे फायदे संपतात तिथे त्यांची निष्ठा देखील संपते." एकूणच काही लोक फक्त गरजेपुरतं प्रेम करतात असे पृथ्वीने म्हटले आहे.
खरं तर खराब फॉर्ममुळे आणि बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पृथ्वी शॉ दीर्घकाळ भारतीय संघाबाहेर राहिला. मात्र, त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी करून तो संघात परतला. पृथ्वीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 363 आणि रणजी ट्रॉफीमध्ये 379 धावा केल्या होत्या. भारताच्या ट्वेंटी-20 संघात आताच्या घडीला सलामीवीर शुबमन गिलला स्थान देण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"