पत्तीशीतील क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा सौरव गांगुली, व्ही व्ही एस लक्ष्मण, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर 'Fantastic Four' चा जलवा अनुभवता येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCC) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये काही सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे. दी वॉल राहुल द्रविड ( Rahul Dravid) हा सीनियर टीमचा मुख्य प्रशिक्षक बनला, व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ( NCA) प्रमुखपदी विराजमान झाला. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये गांगुली, द्रविड व लक्ष्मण हे त्रिकुट पुन्हा एकदा पाहून सर्वांना आनंद झाला आहे. त्यात एक व्यक्तिची कमी जाणवतेय आणि तो म्हणजे सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar).. आता ती उणीवही भरून निघणार आहे आणि क्रिकेट चाहत्यांना पुन्हा तो 'Golden Era' अनुभवता येणार आहे.
भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळे यानंही वर्षभर का होईना भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचे काम पाहिले. तेंडुलकरही काही काळ क्रिकेट सल्लागार समितीवर होता. पण, आता तेंडुलकर पुन्हा भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत गांगुलीनं दिले आहेत. पण, या मार्गात 'conflict of interest' हा सर्वात मोठा अडथळा असेल, हेही त्यानं मान्य केलं. बोरिया मजुमदार यांच्या 'Backstage with Boria' या कार्यक्रमात गांगुली म्हणाला,''सचिन तेंडुलकर हा वेगळा आहे. त्याला या सर्व गोष्टीत सहभाग घेणे आवडत नाही. पण, भारतीय क्रिकेटमध्ये सचिनचा कोणत्यातरी मार्गानं सहभाग असेल, याची मला खात्री आहे. त्यापेक्षा चांगली बातमी असूच शकत नाही. सचिनचा सहभाग कसा करून घेता येईल, यावर काम करणे गरजेचं आहे.''
''तेथे हितसंबंध जपण्याचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. चूक किंवा बरोबर, कोणत्याही मार्गानं हितसंबंध जपल्याचा मुद्दा उपस्थित राहतोच. मला हे कधीकधी अवास्तव वाटतं. त्यामुळे भारतीय क्रिकेटसाठी सर्वोत्तम व्यक्तिचं योगदान कसं मिळवता येईल, यासाठी योग्य मार्ग काढायला हवा. सचिनही यातून मार्ग काढेल आणि भविष्यात नक्की भारतीय क्रिकेटमध्ये वेगळ्या भूमिकेत दिसेल,''असा विश्वास गांगुलीनं व्यक्त केला.
सचिन तेंडुलकर हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा मेंटॉर म्हणून काम पाहतोय.