Taniyaa Sapna Bhatia Shocking Claim : भारतीय महिला संघाने इंग्लंड दौरा गाजवला... ट्वेंटी-२० मालिकेत १-२ अशा पराभवानंतर भारतीय संघाने वन डे मालिकेत सव्याज वसूली केली. भारताची दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी हिची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका होती आणि त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूने झोकून देत कामगिरी केली. भारताने वन डे मालिका ३-० अशी जिंकून इतिहास घडविला. भारताने २३ वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकली होती, पंरतु ३-० असा विजय प्रथमच मिळवला. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दीप्ती शर्माने केलेलं मंकडिंग सध्या चर्चेचा विषय ठरतोय. त्यात भारतीय महिला संघाची विकेटकिपर-फलंदाज तानिया भाटिया ( Taniyaa Bhatia) हिच्या ट्विटने खळबळ उडवली आहे.
दीप्ती शर्मा खोटारडी! 'मंकडिंग' वादावर इंग्लंडची कर्णधार हिदर नाइटचा भारतीय खेळाडूवर आरोप
२८ नोव्हेंबर १९९७ मध्ये चंडीगढ येथे जन्मलेल्या तानियानं कमी वयातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. २०१८मध्ये तिनं वयाच्या २२व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तानियाचे वडील संजय भाटिया यांनी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्तरावर क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. शालेय स्तरावर तिला भारताचा फलंदाज युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनी प्रशिक्षण दिले. तानियानं वयाच्या ११व्या वर्षीच पंजाबच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं आणि ती सर्वात युवा खेळाडू होती. क्रिकेटसोबतच तिचं प्राण्यांवरही विशेष प्रेम आहे. १३व्या वर्षी तिनं आंतरराज्य स्थानिक स्पर्धेत पंजाबच्या वरिष्ठ संघात स्थान पटकावले. अशी कामगिरी करणारी ती सर्वात युवा खेळाडू होती. २०१५च्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेत तिनं उत्तर विभागाच्या संघाचे नेतृत्व सांभाळले होते. तिनं २२७ धावा करताना १० बळी टिपले होते.
तानियाने ट्विट केले की, ''भारतीय महिला संघाच्या इंग्लंड दौऱ्याची मीही सदस्य होते आणि आम्ही लंडन येथील मॅरियट हॉटेलमध्ये थांबलो होतो. पण, मला तेथील व्यवस्थापनाचा धक्कादायक व निराशाजनक अनुभव आला. तेथील नुकत्याच वास्तव्यादरम्यान कोणीतरी माझ्या वैयक्तिक खोलीत घुसले आणि रोख, कार्ड, घड्याळे आणि दागिन्यांसह माझी बॅग चोरली. हे असुरक्षित आहे...''