कोलकाता नाईट रायडर्सकडून २०२०च्या आयपीएलमध्ये मोजकीच संधी मिळालेल्या २२ वर्षीय फलंदाजानं इंग्लंडमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज टॉम बँटन ( Tom Banton) यानं ट्वेटी-२० ब्लास्ट ( T20 Blast) स्पर्धेत सोमवारी केंट क्लबच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली. समरसेट क्लबचे प्रतिनिधित्व करताना त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर संघानं १६९ धावांचे लक्ष्य सहज पार केले.
प्रथम फलंदाजी करताना झॅक क्रॅवली ( ३९), जोए डेन्ली ( ३६) यांनी दमदार खेळी करताना केंटला ८ बाद १६८ धावांपर्यंत मजल मारून दिली. समरसेटच्या लेवीस ग्रेगरीनं २७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. पण, टॉम बँटन आणि डेव्हॉन कॉनवेय यांनी एकही विकेट न गमावता समरसेटला विजय मिळवून दिला. या दोघांनी १५.४ षटकांत १६९ धावांचे लक्ष्य पार केले. बँटननं ४७ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्यानं ५१ चेंडूंत नाबाद १०७ धावा केल्या. त्यात ८ चौकार व ७ षटकारांचा समावेश आहे. कॉनवेय यानं ४४ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या.