Ravi Shastri advices Rahul Dravid : मागील काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहे. भारताच्या तीनही फॉरमॅटच्या संघाचे कर्णधार बदलले, मुख्य प्रशिक्षकही बदलला. माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर महान फलंदाज राहुल द्रविड याच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी आली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच मालिकेत टीम इंडियानं विजय मिळवून द्रविडच्या मार्गदर्शनाखाली चांगली सुरुवात केली. पण, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला कसोटीपाठोपाठ वन डे मालिकेतही पराभव पत्करावा लागला. आता आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन भारतीय संघ तयारीला लागला आहे. माजी प्रशिक्षक शास्त्री यांनी आता द्रविडला सल्ला दिला आहे.
सहा महिन्यांच्या कालावधीत विराट कोहलीनं तीनही फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं. सप्टेंबरमध्ये त्यानं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर मागील महिन्यात बीसीसीआयनं त्याला वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले. आफ्रिका मालिकेनंतर विराटनं कसोटीचे कर्णधारपद सोडले. रोहित शर्मा हा भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार आहे आणि कसोटी संघाची जबाबदारीही त्याच्याकडेच सोपवली जाणार असल्याची शक्यता आहे.
संघात एवढे बदल होत असताना शास्त्रींनी द्रविडला सल्ला दिला. या अवस्थांतराच्या कालावधीत संघात काही बदल व्हायला हवेत असे शास्त्री म्हणाले. शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलवर ते बोलत होते. ते म्हणाले,''भारतीय क्रिकेटसाठी हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. पुढील ८-१० महिन्यांचा काळ हा अवस्थांतराचा आहे. त्यामुळे पुढील ४-५ वर्ष संघाच्या कामी येतील अशा खेळाडूंना शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. युवा आणि अनुभव यांचा योग्य समतोल राखला गेला पाहिले, यावर मी नेहमी विश्वास ठेवला आहे.''
''भविष्याचा विचार करून काही बदल करणे गरजेचे आहे. हीच ती वेळ आहे. पुढील सहा महिन्यांत अशा युवा खेळाडूंचा शोध घ्यायला हवा, त्यासाठी त्यांनी तातडीनं पाऊल टाकायला हवेत. एकाच खेळाडूवर दीर्घ काळ चिकटून राहिलात तर पुढे जुळवून घेताना अवघड होईल,''असेही शास्त्री म्हणाले.