नवी दिल्ली : चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने इंग्लंड दाैऱ्यातून वगळल्यानंतर निराश होऊन प्रतिक्रिया दिली. ‘मैदानात यष्टीमागून महेंद्रसिंग धोनीचे मार्गदर्शन मी मिस करतो. त्याच्याकडे अपार अनुभव होता. तो सतत यष्टीमागून मोठ्या आवाजात माझ्यासारख्या गोलंदाजाला मार्गदर्शन करायचा. कधी कधी त्या गोष्टींची आठवण झाली की, पोकळी जाणवते,’ असे मत कुलदीपने बुधवारी व्यक्त केले. धोनीने मागीलवर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
कुलदीप म्हणाला, “कधी कधी मला माही भाईच्या मार्गदर्शनाची आठवण येते. ऋषभ पंतने आता धोनीचे स्थान घेतले. तो जितका खेळेल, तितका तो आम्हाला भविष्यात अधिक इनपुट देण्यास सक्षम असेल. मला नेहमीच असे वाटते की, प्रत्येक गोलंदाजाला अशा पार्टनरची आवश्यकता असते, जो खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने प्रतिसाद देईल.”
कुलदीपने २०१९ मध्ये २३ एकदिवसीय सामने खेळले. २०२० आणि २०२१ मध्ये त्याने आतापर्यंत फक्त ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कुलदीप पुढे म्हणाला, “जेव्हा धोनी संघात होता, तेव्हा मी व युजवेंद्र चहल खेळत होतो. माही भाई गेल्याने चहल व मी एकत्र खेळलेलो नाही. मला फक्त दहा सामने खेळलो. एकदा मी हॅटट्रिकही घेतली. माझ्या कामगिरीकडे पाहाल, तर त्यात काही उणीव जाणवणार नाही.” आयपीएलमध्ये यंदा एकाही सामन्यात संधी न मिळाल्याबद्दल कुलदीपने मतप्रदर्शन केले. ‘मी फॉर्ममध्ये नाही. संघात फलंदाजी आणि गोलंदाजीत यशस्वी ठरू शकणाऱ्यांना स्थान दिले जाते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्ध फक्त एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली,’ असे कुलदीपने सांगितले.
मी इतका वाईट आहे काय?
‘‘कोलकाता नाईट रायडर्स संघात संधी न मिळाल्यामुळे मी मानसिकरित्या अस्वस्थ झालो. मी इतका वाईट आहे की काय, याचा विचार करण्यास सुरुवात केली. हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय होता आणि त्यांना विचारणे योग्य नव्हते. चेन्नईची खेळपट्टी फिरकीला पोषक आहे आणि असे असूनही मला खेळायची संधी मिळाली नाही. मला आश्चर्य वाटले, पण काहीही करता आले नाही,” असे कुलदीप म्हणाला.
Web Title: Sometimes I miss Dhoni's guidance says Kuldip yadav
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.