मुंबई : क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी कधी थोड्या नशिबाची गरज असते, असे सांगताना महान क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी विश्वचषकाच्या अंतिम लढतीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव आणि भारताच्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शानदार विजयाचे उदाहरण दिले.
भारत गतवर्षी सलग दहा सामने जिंकून वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. पण, स्पर्धेतील सर्वोत्तम संघ जेव्हा विजेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाशी भिडला, तेव्हा सर्वकाही त्यांच्या विरुद्ध घडले. सहा महिन्यांनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी मिळून अपूर्ण काम पूर्ण केले. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम लढतीत तगड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला नशिबाने साथ दिली.
२९ जूनला बार्बाडोस येथे अंतिम फेरीत नशिबाची आशा बाळगणे आणि निश्चित प्रक्रियेवर स्थिर राहणे संघासाठी किती महत्त्वाचे होते याची आठवण द्रविड यांनी बुधवारी केली. द्रविड यांना सिएट क्रिकेट रेटिंग अवाॅर्ड्स या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते म्हणाले की, आम्ही केलेल्या बऱ्याच गोष्टींबद्दल विचार करायला मला वेळ मिळाला.
कधी कधी तुमच्या लक्षात येते की, तुम्हाला यापैकी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला प्रक्रियेचे पालन करावे लागेल. तुम्हाला सर्वकाही व्यवस्थित करावे लागेल. द्रविड म्हणाले की, कधी कधी तुम्हाला थोड्या नशिबाची गरज असते. टी-२० विश्वचषक अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेला ३० चेंडूंत ३० धावांची गरज होती. तेव्हा रोहितने संयम राखत शानदार रणनीती राबविली.
डेव्हिड मिलरला बाद करण्यासाठी सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर घेतलेल्या झेलाचा उल्लेख करताना द्रविड म्हणाले की, आम्हाला काय करायचे आहे यावर आम्ही लक्ष केंद्रित केले नाही. परंतु, आम्हाला एका विशिष्ट मर्यादेत ते करू शकेल अशा खेळाडूची गरज आहे. कधी कधी ते कौशल्य असते. या झेलामुळे सामना भारताकडे झुकला.
वनडे विश्वचषकाच्या अंतिम लढतीत ट्रॅव्हिस हेडला बाद करण्यात थोडक्यात अपयश आले. नशिबाने त्याला साथ दिली. त्यानेही शतकी खेळी करत भारताची आशा संपुष्टात आणली. द्रविड म्हणाले की, कधी कधी काही गोष्टी तुमच्यासाठी अनुकूल होऊ शकतात. पण, त्यासाठी प्रक्रियेवर कायम राहायला हवे.
वारसा पुढे नेणारे सक्षम खेळाडूद्रविड यांनी खेळाडूंची पुढील पिढी फॅब फाइव्हचा वारसा समर्थपणे पुढे नेला आहे, असे सांगितले. द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण फॅब फाइव्हचा भाग होते. जगभरातील चाहत्यांना त्यांनी आपलेसे केले होते. क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांचा विचार करता १२ वर्षांत मिळालेले यश अभूतपूर्व आहे, असेही द्रविड म्हणाले.