इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाचे आव्हान क्वालिफायर २ च्या लढतीत संपुष्टात आले. राजस्थान रॉयल्सने ( RR) शुक्रवारी झालेल्या लढतीत ७ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. २०१६नंतर प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे RCBचे स्वप्न धुळीस मिळाले. या पराभवानंतर माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली. त्यात त्यानं संघ व्यवस्थापक आणि चाहत्यांचे आभार मानले.
त्याने लिहिले की, कधी तुम्ही जिंकता, तर कधी नाही, परंतु १२वा खेळाडू म्हणून तुम्ही उभी केलेली आर्मी नेहमी आमच्या पाठिशी खंबीर उभी राहिली. तुमच्यामुळे क्रिकेट स्पेशल ठरले. नवीन शिकण्याची भूक अजूनही कायम आहे. संघ व्यवस्थापन, सपोर्ट स्टाफ आणि या फ्रँचायझीचा भाग असलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार. पुढील पर्वात भेटू...
आयपीएलच्या ९ पर्वानंतर
विराट कोहली प्रथमच दुसऱ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळला. २०१३ ते २०२१ या कालावधीत विराटने RCBचे कर्णधारपद भूषविले. आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा होण्याआधी विराटने कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. यंदाच्या पर्वात विराटला १६ सामन्यांत २२.७३च्या सरासरीने ३४१ धावा करता आल्या.
क्वालिफायर २ लढतीत विराट ७ धावांवर बाद झाला आणि संघाला ८ बाद १५७ धावाच करता आल्या. RR ने जोस बटलरच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर १८.१ षटकांत हे लक्ष्य सहज पार केले. रविवारी २९ मे रोजी गुजरात टायटन्स आणि राजस्थान यांच्यात जेतेपदाचा सामना होणार आहे.
Web Title: Sometimes you win, and sometimes you don't,Virat Kohli thanks RCB management, fans after defeat against Rajasthan Royals in qualifier
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.