मुंबई : तुमच्यामध्ये जर गुणवत्ता असेल, चिकाटी आणि अथक मेहनत घेण्याची तयारी असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. भारताच्या 19 वर्षांखालील संघात अथर्व अंकोलेकरची निवड करण्यात आली आहे. अथर्वचे बाबा बेस्टमध्ये कंटक्टर होते. पण 2010 साली अथर्वच्या बाबांचे निधन झाले. पण अथर्वने हार मानली नाही आणि आता भारताच्या 19 वर्षांखालील संघात त्याने स्थान मिळवले आहे.
भारताचा 19 वर्षांखालील संघ श्रीलंकेमध्ये पुढील महिन्यात जाणार आहे. पुढच्या महिन्यात श्रीलंकेमध्ये युथ एशिया कप होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या 19 वर्षांखालील संघाची निवड करण्यात आली आहे आणि या संघात अथर्वला स्थान देण्यात आले आहे.
वडिलांच्या निधनानंतर अथर्वला क्रिकेटसाठी आईने प्रोत्साहन दिले. अथर्व फक्त क्रिकेट खेळत नाही तर त्याचे शिक्षणही चालू आहे. अथर्व हा मुंबईतील रिझवी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
अथर्वची जेव्हा भारतीय संघात निवड करण्यात आली तेव्हा मला बरेच शुभेच्छांचे मेसेज आले. माझे पती विनोद हे बेस्टमध्ये कंडक्टर होते. त्यांचे निधन झाले आणि आम्ही बेसहारा झालो. कारण आमच्या घरामध्ये ते एकटेच कमावते होते. सुरुवातीच्या काही काळात मी मुलांच्या शिकवण्या घेतल्या. पण कालांतराने मला पतींच्या जागी बेस्टमध्ये नोकरी देण्यात आली, असे अथर्वच्या आईने सांगितले.
या निवडीबद्दल अथर्वने सांगितले की, " माझ्या वडिलांचे स्वप्न मी साकार करतो आहे. आज मला त्यांची फार आठवण येत आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे बाबा माझ्या उशीजवळ बॅट आणून ठेवायचे. ज्यावेळी माझ्याकडून चांगली कामगिरी व्हायची, तेव्हा ते अन्य क्रिकेटचे साहित्य आणून ठेवायचे. या सर्व गोष्टींची आता मला आठवण येत आहे."