कोलंबो : इंग्लंडमध्ये होणा-या आगामी विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर लवकरच २०-२५ खेळाडूंचा कोअर ग्रुप तयार करण्यात येणार असल्याचे भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले.
खेळाडूंची निवड करताना कोहली द्विधा मन:स्थितीत असेल कारण सीनिअर गोलंदाज उमेश यादव, आर. अश्विन आणि मोहम्मद शमी निवडीसाठी उपलब्ध असतील. दुसरीकडे अक्षर पटेल, यजुर्वेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्यासारख्या ज्युनिअर खेळाडूंनीही श्रीलंकेविरुद्ध ५-० ने विजय मिळवताना महत्त्वाची भूमिका बजावली.
कोहली म्हणाला, ‘सर्वांत चांगली बाब म्हणजे पारदर्शिता आहे. विश्वकप स्पर्धेसाठी संभाव्य २०-२५ खेळाडूंमध्ये कोण असेल, याची लवकरच माहिती देण्यात येईल. सर्व खेळाडूंना वेगवेगळ्या पातळीवर आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची संधी मिळेल. विश्वकप स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत असलेल्या फिरकीपटूंसाठी हे मोठे आव्हान असेल. आम्ही कुठली शक्यता वर्तविणार नाही, पण गोलंदाजीमध्ये आमच्याकडे एक्स-फॅक्टर असावा, असे आम्हाला वाटते.’
खेळाडू बाहेर असल्याचे दु:ख व्यक्त करण्यापेक्षा आव्हानाला सामोरे जात असल्यामुळे आनंद होत असल्याचे कोहलीने सांगितले. कोहली म्हणला, ‘खेळाडूंमध्ये असलेली खिलाडूवृत्ती आमच्या संघातील सर्वांत चांगली बाब आहे.
ते आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज असतात. निराश होण्यापेक्षा ते कसून मेहनत घेण्यास प्राधान्य देतात. कुठल्याही निर्णयामुळे
नाराज न होणारे खेळाडू संघात असल्यामुळे मी स्वत:ला नशिबवान समजतो आणि त्यामुळे माझे बरेच काम सोपे होते.’
कोहलीने मालिकेत चमकदार कामगिरी करणाºया गोलंदाजांची प्रशंसा करताना म्हटले की, ‘फिरकीपटूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली. अक्षरने फलंदाजांना वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांनीही छाप सोडली. बुमराह गेल्या दीड वर्षांत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वांत प्रभावी गोलंदाज आहे. त्याने आपल्या गोलंदाजीवर बरीच मेहनत घेतली आहे.’ (वृत्तसंस्था)
निश्चित असे पॅटर्न नाही-
विराट पुढे म्हणाला, ‘विश्वकप स्पर्धेसाठी लवकरच आमचा कोअर ग्रुपचा शोध संपेल. आगामी काही मालिका आमच्यासाठी महत्त्वाच्या असतील. त्यामुळे संघाचे योग्य संतुलन साधण्यासाठी मदत मिळेल. भारतीय वन-डे संघात स्थान मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्रमावर फलंदाजी करण्याची क्षमता व फलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या गोलंदाजाची गरज आहे. आम्हाला कुठल्याही क्रमावर फलंदाजी करण्यास सक्षम असलेले ११ खेळाडू पाहिजे. आम्ही दुसºयाला आकलन करण्याची संधी देण्यास इच्छुक नाही. त्यामुळे निश्चित असे कुठले पॅटर्न तयार नाही.’
सचिनचा विक्रम मोडण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल : कोहली
कोलंबो : रिकी पॉन्टिंगच्या ३० वन-डे शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधणे सन्मानाची बाब असून सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांच्या विश्वविक्रमासमीप पोहचण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. कोहली म्हणाला,‘महान सचिन तेंडुलकर अद्याप बराच पुढे आहे. तो पल्ला गाठण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल. मी त्याबाबत विचारही करीत नाही.’
कर्णधारपद सोडण्याचे कुठलेच कारण नाही : थरंगा
भारताविरुद्ध वन-डे मालिकेत ५-० ने पराभव स्वीकारावा लागला असला तरी कर्णधारपद सोडणार नसल्याचे श्रीलंका वन-डे संघाचा कर्णधार उपुल थरंगाने म्हटले आहे. थरंगा म्हणाला,‘कर्णधारपद सोडण्याचे कुठलेच कारण नाही. आगेकूच कशी करायची, याचा विचार पुढील निवड समिती करेल. गेल्या दोन वर्षांत आमची कामगिरी ढेपाळली. खेळाडू या निराशाजनक कालखंडातून बाहेर पडतील.’
सध्याचे खेळाडू संगकारा, जयवर्धनेचे स्थान घेऊ शकत नाहीत : अरनॉल्ड
माहेला जयवर्धने व कुमार संगकारा यांचे स्थान सध्याच्या संघातील खेळाडू घेऊ शकत नाही आणि तशी आशा करणे चुकीचे ठरेल, असे मत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू रसेल अरनॉल्डने व्यक्त केले. अर्नाल्ड म्हणाला,‘संगकारा आणि जयवर्धने यांच्यासारख्या खेळाडूंचे स्थान कुणीच घेऊ शकत नाही. या दोघांसह तिलकरत्ने दिलशानचे स्थानही भरून काढणे शक्य नाही. असे खेळाडू एकदाच घडत असतात.’
Web Title: Soon the Core Group will be ready, the details of the probables will be given to the World Cup: Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.