मुंबई : महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या निरोपाच्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सलग शतकं झळकावली होती. कसोटी कारकिर्दीतील रोहितची ही सुवर्ण खेळी म्हणावी लागेल, कारण त्यानंतर त्याला कसोटीत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यानंतर त्याला केवळ एकच शतक झळकावता आले. गतवर्षी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून त्याने कसोटी संघात पुनरागमन केले.
2017 च्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितने 2017 च्या सरासरीने 217 धावा केल्या होत्या. 2018च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याला संधी मिळाली होती, परंतु त्याला पहिल्या दोन सामन्यांत 78 धावाच करता आल्या. त्यामुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले. मात्र, आशिया चषक स्पर्धेतील आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डेतील कामगिरीनंतर त्याचा कसोटी संघात समावेश व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे. रोहितने 25 कसोटीत 1479 धावा केल्या आहेत.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यालाही आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी संघात रोहितला संधी मिळावी असे वाटत आहे. तो म्हणाला,''सातत्यपूर्ण खेळीच्या जोरावर त्याने आत्मविश्वास परत मिळवला आहे. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवड समितीने त्याच्या नावाचा विचार करावा. मागील दोन वर्षांत त्याचा खेळ अधिक परिपक्व झाला आहे.''