सौरव गांगुली ठरला ‘दादा’ कर्णधार

विश्वचषक क्रिकेट : एकाच सत्रात सर्वाधिक शतके नोंदविण्याचा विश्वविक्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 05:07 AM2019-05-22T05:07:58+5:302019-05-22T05:08:01+5:30

whatsapp join usJoin us
Sourav Ganguly became the 'Dada' Captain | सौरव गांगुली ठरला ‘दादा’ कर्णधार

सौरव गांगुली ठरला ‘दादा’ कर्णधार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : आतापर्यंत झालेल्या ११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये अनेक विक्रमांची नोंद झाली. काही विक्रम मोडले गेले, तर काही विक्रम जेव्हा रचले गेले, तेव्हापासून आजपर्यंत कायम आहेत. असा एक विक्रम भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर आजपर्यंत कायम आहे. मात्र, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत हा विक्रम मोडण्याची शक्यताही आहे.


विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एकूण १०७ कर्णधारांनी आपापल्या संघाचे नेतृत्व केले. दिग्गज फलंदाज असलेल्या गांगुलीने कर्णधार म्हणून विश्वचषकाच्या एकाच सत्रात सर्वाधिक शतके झळकाविण्याचा विश्वविक्रम रचला. दखल घेण्याची बाब म्हणजे, २००३ साली रचलेला हा विक्रम अजूनपर्यंत कोणत्याही कर्णधाराला मोडता आलेला नाही. चार दशकांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खूप कमी खेळाडूंना आपली छाप पाडण्यात यश आले असून, यामध्ये गांगुलीने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने कधीही विश्वविजेतेपद जिंकले नाही, पण एक मात्र खरे की, त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाला विदेशात जिंकण्याची सवय लागली.


२००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अडखळत्या सुरुवातीनंतर लवकरच लय पकडताना थेट अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, आॅस्टेÑलियाने निर्विवाद वर्चस्व राखलेल्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावा फटकावताना मालिकावीरचा पुरस्कार पटकावला होता. सचिनच्या मागोमाग सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज होता गांगुली.


गांगुलीने या स्पर्धेत खेळलेल्या ११ सामन्यांत ५८.१२ च्या जबरदस्त सरासरीने ४६५ धावांचा तडाखा देत तीन शतके झळकावली होती. स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच एका कर्णधाराने विश्वचषकातील एकाच सत्रात तीन शतके झळकावली होती. गांगुलीपाठोपाठ याच विश्वचषकामध्ये आॅस्टेÑलियाचा कर्णधार रिकी पाँटिंग याने दोन शतके झळकावली होती. मात्र, आज सुमारे १६ वर्षांनंतरही गांगुलीचा हा विश्वविक्रम अबाधित आहे. असे असले, तरी यंदा हा विक्रम मोडला जाऊ शकतो. कारण भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या सातत्याने खेळत आहे, ते पाहता गांगुलीचा विश्वविक्रम मोडणे त्याच्यासाठी फार कठीण नसेल.


कांगारूंनी झळकावली सर्वाधिक शतके!
विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास लक्षात येईल की, आॅस्टेÑलियाच्या फलंदाजांनी या स्पर्धेवर वर्चस्व राखताना सर्वाधिक शतकांची नोंद केली आहे. त्यांनी आतापर्यंत २६ शतके झळकावली असून, दुसऱ्या क्रमांकावर भारतीय फलंदाज आहेत.
भारत याबाबतीत आॅस्टेÑलियाच्या तुलनेत केवळ एका शतकाने मागे असून, सध्या भारतीय फलंदाजांचा धडाका पाहता, आॅस्टेÑलियाचा विक्रम मागे टाकण्यात त्यांना सहज साध्य होईल. आॅस्टेÑलिया आणि भारतानंतर श्रीलंका २३ शतकांसह तिसºया स्थानी आहे.
आक्रमक आणि फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांमुळे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीयांना आॅस्टेÑलियाला मागे टाकण्याची नामी संधी आहे. यासाठी कर्णधार कोहलीसह, रोहित शर्मा, शिखर धवन यांच्यावर मुख्य मदार असेल.

कोहलीकडे संधी!
आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधार म्हणून विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी असतानाही त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. त्यामुळेच तो गांगुलीचा हा शतकांचा विक्रम मागे टाकू शकतो असे म्हटले जात आहे आणि एकूणच त्याचा सुरु असलेला धडाका पाहता हा विक्रम यंदा मोडलाही जाऊ शकतो. २०११ आणि २०१५ सालच्या विश्वचषक स्पर्धेतील अनुभवाच्या जोरावर कोहली छाप पाडू शकतो.

सर्वाधिक शतके झळकावणारे संघ
१. आॅस्टेÑलिया २६
२. भारत २५
३. श्रीलंका २३
४. वेस्ट इंडिज १७
५. न्यूझीलंड १५
६. दक्षिण आफ्रिका १४
७. पाकिस्तान १४
८. इंग्लंड ११
९. बांगलादेश २

Web Title: Sourav Ganguly became the 'Dada' Captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.