Virat Kohli vs Sourav Ganguly, Virender Sehwag: भारतीय संघातील काही क्रिकेटपटूंवर मॅच फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर १९९९ नंतर क्रिकेटविश्वात खळबळ माजली होती. त्यावेळी सौरव गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि एक मजबूत अशी टीम इंडिया उभी केली. काही नवे आणि काही अनुभवी खेळाडू एकत्र करून गांगुलीने संघाची बांधणी केली आणि विदेशातही क्रिकेट मालिका जिंकणारा भारतीय संघ तयार केला. महेंद्रसिंग धोनीच्या वेळी बरेचसे खेळाडू हे अनुभवी आणि वयाने त्याच्यापेक्षा खूप मोठे होते. या साऱ्यांचा मेळ घालून त्याने चांगली संघबांधणी केली. विराट कोहलीनेदेखील सात वर्षांच्या कारकिर्दीत संघाचे कर्णधारपद उत्तमपणे निभावले, पण विरेंद्र सेहवागने मात्र याबद्दल शंका उत्तन्न केली.
विराट कोहलीबद्दल काय म्हणाला सेहवाग...
"सौरव गांगुलीने संघाची बांधणी केली. काही नवीन खेळाडूंना संघात स्थान दिले. त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. खेळाडूंच्या सुखदु:खात त्यांना साथ दिली. विराटने कोहलीने अशाप्रकारचं काही केलं असेल का याबद्दल मला शंका आहे. माझ्या मते एखाद्या संघाचा नंबर १ कर्णधार तोच असतो जो एका उत्तम संघांची यशस्वीपणे बांधणी करतो. चांगला कर्णधार आपल्या संघातील खेळाडूंना नेहमी विश्वास देत असतो की तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल. विराट कोहलीनेदेखील काही खेळाडूंना पाठिंबा दिला. पण काही खेळाडूंच्या पाठिशी तो उभा राहिला नाही", अशा स्पष्ट शब्दात विरेंद्र सेहवागने त्याच्या भावना बोलून दाखवल्या.
विराट कोहली vs सौरव गांगुली
सौरव गांगुलीने सुमारे पाच वर्षांच्या कारकिर्दीत ४९ कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. त्यापैकी २१ विजय, १५ अनिर्णित आणि १३ पराभवांसह अशी त्याची कारकिर्द होती. तसेच त्याच्या काळात संघाच्या विजयाची टक्केवारी ४२.८५ इतकी होती. दुसरीकडे, कोहलीचा कसोटी कर्णधार म्हणून २०१६ ते जानेवारी २०२२ या कालावधीतील अनुभव जास्त चांगला होता. त्याने ६८ कसोटी सामन्यांमध्ये ५८.८२ च्या विजयाच्या टक्केवारीसह चांगले नेतृत्व केले.