नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर असला तरी त्याच्या निवृत्तीच्या चर्चा थांबता थांबेनात... त्याच्या भविष्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. दोन वर्ल्ड कप नावावर असलेला भारताचा माजी कर्णधार धोनीनं इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत अखेरचे संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेतली. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानच धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाल्या होत्या. धोनीलाही साजेशी कामगिरी करता येत नसल्याने त्यानं रिषभ पंतसारख्या युवा यष्टिरक्षकासाठी स्थान रिक्त करावे, अशी अनेकांची मागणी आहे.
Video : कॅप्टन कूल धोनीच्या नव्या लूकची चर्चा तर होणारच...
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनंही कॅप्टन कूल धोनीच्या भविष्याबाबत सूचक विधान केले आहे. तो म्हणाला,''खरं सांगायचं तर, माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही. संघ व्यवस्थापक काय विचार करतात यावर सर्व अवलंबून आहे. धोनी आता तरूण राहिलेला नाही. त्यामुळे हा निर्णय प्रत्येक खेळाडूला आयुष्यात घ्यावाच लागतो. त्यामुळे पुढील तीनेक महिने आपण वाट पाहूया.''
गांगुलीनं यावेळी रिषभ पंतची पाठराखण केली.''रिषभ पंत संघात आहे आणि तो चांगली कामगिरीही करत आहे. पण, पुन्हा एकदा निवड समितीच्या डोक्यात काय चाललंय आणि ते काय विचार करतात यावर सर्व अवलंबून आहे.''
विराट हे वागणं बरं नव्हे, माजी कर्णधार सौरव गांगुलीनं दिला सल्ला
कर्णधार विराट कोहलीनं या सामन्यात अंतिम अकरामध्ये बदल करण्याची परंपरा कायम राखली. कोहलीनं मागील 38 कसोटीत अंतिम अकरामध्ये बदल केले आहेत आणि त्याची पुनरावृत्ती विंडीजविरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाली. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत येणाऱ्या कसोटीत टीम इंडियाने आर अश्विनला बाकावर बसवले. कोहलीच्या या वागण्यावर माजी कर्णधार सौरव गांगुलीनं नाराजी प्रकट केली.
तो म्हणाला,''सतत संघ बदलत राहण्याच्या गोष्टीवर विराटने विचार करायला हवा. त्याने संघात सातत्य राखण्याची गरज आहे. ज्या खेळाडूंची निवड करशील त्यांना सातत्य राखण्याची संधी द्यायला हवी. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी, लय सापडण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देण्याची गरज आहे. हे मी यापूर्वीही सांगितले आहे. श्रेयस अय्यरने वन डे मालिकेत दमदार कामगिरी केली. त्याची निवड करायला हवी आणि त्याला खेळण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. श्रेयससारखे अनेक खेळाडू आहेत, त्यांना संधी व वेळ देणे गरजेचे आहे. विराट असे करेल असा विश्वास आहे.''
Web Title: Sourav Ganguly comments on 38-year-old MS Dhoni's future
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.