मुंबई - बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हितसंबंधांच्या संघर्षाशी संबंधीत नव्याने वादात सापडण्याची चिन्हे आहेत. सौरव गांगुली आरपीएसजी व्हेंचर्स लिमिटेडसोबत इंडियन सुपर लीगमध्ये एका फुटबॉल संघाचे सहमालक आहेत. आता याच कंपनीने आयपीएलमधील नवा संघ लखनौची खरेदी केली आहे. या संघाने लखनौ फ्रँचायझीसाठी ७ हजार ९० कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली होती. आयपीएलमधील दोन नव्या संघांसाठीची लिलाव प्रक्रिया सोमवारी दुबईमध्ये झाली होती.
याबाबत इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार इंडियन सुपर लीगमधील फुटबॉल क्लब एटीके मोहन बागानच्या अधिकृत संकेतस्थळावर सौरव गांगुली हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा सदस्य असल्याचा उल्लेख आहे. या संघाचे चेअरमन गोयंका आहेत. एटीके मोहन बागानचा मालकी हक्क हा कोलकाता गेम्स अँड स्पोर्ट्स प्रा.लिमिटेडकडे आहे. यामध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, व्यावसायिक हर्षवर्धन नियोतिया, संजीव गोयंका आणि उत्सव पारेख यांचा समावेश आहे.
इंडियन एक्स्प्रेससोबतला माहिती देताना बीसीसीआयचे एका वरिष्ठ सदस्याने सांगितले की, हे स्पष्टपणे हितसंबंधांच्या संघर्षाचा प्रकार आहे असे सांगितले. गांगुली हे बोर्डाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी याबाबत काळजी घेतली पाहिजे. गांगुलीबाबत अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिली वेळ नाही आहे. मात्र याबाबत गांगुली आणि गोयंका यांनी कुठलेही उत्तर दिलेले नाही.
दरम्यान, सीएनबीसी-टीव्ही१८ सोबतच्या मंगळवारच्या मुलाखतीदरम्यान सौरव गांगुली यांच्यासोबतच्या हितसंबंधांच्या संघर्षाबाबत गोयंरा यांनी सांगितले की, मला वाटते सौरव गांगुली मोहन बागानमधून पूर्णपणे बाजूला होणार आहेत. याबाबत अधिक विचारणा केली असता हे सर्व आजच होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र नंतर गोयंका यांनी सौरव गांगुली यांच्यावर आहे की याबाबत कधी निर्णय घ्यावा. मी आधीच याबाबत बोललो त्याबाबत क्षमस्व.
मात्र भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराच्या वतीने मंगळवारी रात्रीपर्यंत मोहन बागानसोबतच्या आपल्या संबंधाबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सौरव गांगुली फुटबॉल क्लबशी असलेला संबंध संपवला तरी आपीएलमधील संघांच्या लिलाव प्रक्रियेमध्ये बीसीसीआयमधील अध्यक्ष म्हणून त्यांच्या भागीदारीबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.