भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष झाला आहे. त्यामुळे दहा महिन्यांच्या या कार्यकाळात गांगुली कोणते महत्त्वाचे निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 24 तारखेला गांगुलीच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठीचा संघही निवडला जाणार आहे. पण, या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय दादा घेण्याची शक्यता आहे. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्या भविष्याचा....
माजी कर्णधार धोनी आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून धोनीनं विश्रांती घेणं पसंत केलं. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानच धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, परंतु माहीनं त्याबाबत अद्याप स्पष्ट मत मांडलेले नाही. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली यांनीही निवृत्तीचा निर्णय धोनी स्वतः घेईल असे, मत व्यक्त केले आहे. पण, आता गांगुलीच्या अक्ष्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्याच बैठकीत धोनीच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
38 वर्षीय धोनीच्या मनात काय आहे, हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गांगुलीनं सांगितलं. तो म्हणाला,''धोनीला काय हवंय हे पाहूया.''
भारत-पाक द्विदेशीय मालिका होणार?भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय मालिकेला सुरुवात होणार की नाही, याबाबत गांगुली म्हणाला,''हा प्रश्न तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना विचारा. आम्हाला त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे आता आमच्याकडे या प्रश्नाच उत्तर नाही.''