Saurav Ganguly Police Complaint: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली गेल्या काही महिन्यांपासून विविध घटनांमुळे चर्चेत आहे. गेल्या महिन्यात कोलकता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि खुनाच्या घटनेबाबत मौन बाळगल्या प्रकरणी गांगुलीवर प्रचंड टीका करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाविरोधात गांगुलीने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आता गांगुली एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सौरव गांगुलीने एका व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. कोलकत्ता पोलिसांच्या तुकडीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीत एका व्यक्तीवर बदनामी आणि सायबर बुलिंगचा आरोप करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री सौरव गांगुलीच्या सचिवाने कोलकाता पोलिसांच्या सायबर विभागात एक ईमेल पाठवला. त्यामध्ये व्हिडिओची लिंक शेअर करून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला ईमेल आला असून आम्ही त्याची चौकशी करत आहोत.
कोणाविरोधात केली तक्रार?
ई-मेलमध्ये लिहिण्यात आले आहे की, मृण्मय दास नावाच्या एका व्यक्तीच्याबाबत ही तक्रार आहे. सायबरबुलिंग आणि प्रतिमा मलीन करण्याच्या आरोपाखाली मृण्मय दास यांच्या विरोधात ही तक्रार आहे. या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये सौरव गांगुलीवर टीका करण्यात आली आहे. व्हिडिओतील टीकेमध्ये वाईट भाषेचा वापर करण्यात आला असून काही अपमानजनक टिप्पणी देखील करण्यात आली आहे. अशा गोष्टींमुळे सौरव गांगुली यांची प्रतिमा मलिन होऊ शकते.
व्हिडिओचा संदर्भ केवळ गांगुलीवरील टीकेपुरताच मर्यादित नाही तर त्यांची प्रतिष्ठा आणि सन्मान यांच्याबाबतच्या मुलभूत अधिकारांचेही उल्लंघन आहे. आम्ही या प्रकरणात पोलिसांच्या हस्तक्षेपाची विनंती करतो आणि कृपया गांगुलीची अशा प्रकारे बदनामी आणि धमकी दिल्याबाबत दास यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो. आम्हाला विश्वास आहे की सायबर विभाग या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्वरित आणि आवश्यक पावले उचलेल आणि न्याय मिळवून देईल, अशी विनंती इ-मेल मध्ये करण्यात आली आहे.