हैदराबाद : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने 1-1 अशी बरोबरी मिळवली आहे. या मालिकेचा निकाल काही लागो, परंतु भारताच्या माजी खेळाडूंना उत्सुकता लागली आहे ती 2019 साली इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे विश्वचषक स्पर्धेची. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली अर्थात 'दादा'ने सध्याचा कर्णधार विराट कोहलीला एक भन्नाट चॅलेंज दिले आहे. माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मणने याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आयसीसी विश्वचषक स्पर्धा जवळपास पाच महिन्यांनंतर सुरू होणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 30 मे 2019 पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत भारतच विजयाचा प्रबळ दावेदार असेल असा अंदाज लक्ष्मणने व्यक्त केला आहे. त्याचवेळी त्याने गांगुलीने कोहलीला दिलेल्या मजेशीर चॅलेंजबद्दलचा खुलासा केला.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2019चा विश्वचषक उंचावला, तर टी शर्ट काढणार का, असा प्रश्न लक्ष्मणला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला,''विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड हे प्रबळ दावेदार आहेत. भारतीय म्हणून मला भारत जिंकावे असे वाटते. पण मी काही लॉर्ड्सवर शर्ट काढणार नाही. ते चॅलेंज गांगुलीने कोहलीला दिले आहे. गांगुलीसारखे मला सिक्स पॅक्स नाहीत किंवा लॉर्ड्सवर शर्ट काढण्याएवढा माझ्याकडे आत्मविश्वासही नाही.''
विश्वचषक स्पर्धेचा उद्धाटनीय सामना यजमान इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच होणार आहे. त्यानंतर भारत ऑस्ट्रेलिया ( 9 जून), न्यूझीलंड ( 13 जून) यांच्याशी भिडेल. 16 जूनला भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहेत. भारताला त्यानंतर अफगाणिस्तान ( 22 जून) , वेस्ट इंडिज ( 27 जून), इंग्लंड ( 30 जून), बांगलादेश ( 3 जुलै) आणि श्रीलंका ( 6 जुलै) यांचा सामना करावा लागणार आहे. अंतिम सामना 14 जूलैला पार पडेल.