नवी दिल्ली : आगामी टी २० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघात बदलाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. या विश्वचषकानंतर विराट कोहली मर्यादित षटकांच्या कर्णधार पदावरून पायऊतार होणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु झाली आहे. कोहलीनंतर भारतीय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे येणार असल्याचीही शक्यता बोलली जाते आहे. मात्र आता कर्णधार पदासोबतच संघाच्या मुख्य प्रशिक्षकांच्या बाबतही मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीयसंघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले रवी शास्त्री यांचा करार दोन महिन्यांनी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शास्त्रींनंतर प्रशिक्षक पदाची धुरा राहुल द्रविडकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीने द टेलिग्राफशी बोलताना यावर भाष्य केले आहे. गांगुलीच्या म्हणण्यानुसार रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविडचा प्रशिक्षक पदासाठी विचार केला जाऊ शकतो. मात्र द्रविडची पूर्णवेळ प्रशिक्षकाऐवजी हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते, असे गांगुली म्हणाला. मात्र अद्याप द्रविडशी आपण याबाबत कोणतीही चर्चा केली नसल्याचे गांगुलीने स्पष्ट केले. गांगुलीच्या मते द्रविडसुद्धा पूर्णवेळ प्रशिक्षक होण्यास उत्सुक नसावा.
पण, जेव्हा मुख्य प्रशिक्षकासंदर्भात विचार करुन निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा या सर्व शक्यता पडताळण्यात येईल. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या युवा संघाने घवघवीत यश संपादन केले आहे. कडक शिस्तीच्या द्रविडने अनेक प्रतिभावान भारतीय युवा खेळाडूंना घडविले आहे. शिवाय भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यात जेव्हा श्रीलंका दौऱ्यावर गेला होता तेव्हा राहुल द्रविड या दौऱ्यामध्ये भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील तरुणांच्या या संघाला द्रविडचे मार्गदर्शन लाभले होते.
रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ येत्या टी २० विश्वचषकानंतर संपणार आहे. म्हणजेच रवी शास्त्री यांच्याकडे शेवटचे दोन महिने शिल्लक आहेत. पण रवी शास्त्री यांची हा करार वाढवण्याची इच्छा नसल्याचेही म्हटले जात आहे. तसेच भारतीय नियामक मंडळही कोच रवी शास्त्री यांना थांबण्याचा कोणताही आग्रह करण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे रवी शास्त्री यांची भारतीय संघासोबतची निरोपाची वेळ जवळ आली आहे.
तर राठोड यांचाही विचार होऊ शकतो
भारतीय संघाचे सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक असलेल्या विक्रम राठोड यांच्या नावाचाही मुख्य प्रशिक्षक पदासाठी विचार केला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. विक्रम राठोड हे रवी शास्त्री यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तसेच भारतीय संघासोबतचा त्यांचा समन्वयही उत्तम आहे. शिवाय ते अनेक वर्ष रवी शास्त्रींसोबत असल्यामुळे त्यांची विराट कोहलीशीही विशेष जवळीक आहे. त्यामुळे ते सुद्धा प्रशिक्षक पदासाठी महत्त्वाचे दावेदार असू शकतात.