मुंबई : भारतीय संघातील खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत. कारण सध्याच्या घडीला भारताचा एकही सामना नाही. पण पुढचे वर्ष भारतासाठी महत्वाचे ठरणार आहे. भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताच्या संघाला पुढच्या वर्षासाठी एक चॅलेंज दिले आहे. आता भारतीय संघ हे चॅलेंज पूर्ण करतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
भारतीय संघ जानेवारी महिन्यात १० सामने खेळणार आहे. यामध्ये सात ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. पहिल्यांदा भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मायदेशात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. यानंतर भारताचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात जानेवारी महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये चार ट्वेन्टी-२० सामने खेळवले जाणार आहे.
पुढच्या वर्षी सर्वांचे लक्ष असेल ते ट्वेन्टी-२० विश्वचषकावर. ऑस्ट्रेलियामध्ये नऊ महिन्यांनंतर विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिलेले आहे. भारताने या विश्वचषकासाठी संघ बांधणी सुरु केली आहे.
गांगुली यांनी भारतीय संघाला यावेळी एक चॅलेंज दिले आहे. भारताचा संघ २०१८ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारताने दमदार कामिगिरी केली होती. आगामी वर्षातही भारताला ऑस्ट्रेलियामध्ये खेळायचे आहे.
गांगुली म्हणाले की, " भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या २०१८ साली झालेल्या दौऱ्यात विजय मिळवला होता. पण यावेळी त्यावेळेच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ तगडा आहे. त्यामुळे यावेळी भारताला ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातीत पराभूत करणे सोपे नाही. माझ्यामते ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत नमवणे हे भारतासाठी मोठे चॅलेंज असेल."