भारतीय संघाचा आगामी वेस्ट इंडिज दौरा गाजतोय तो बीसीसीआयने जाहीर केलेल्या वन डे व कसोटी संघांवरून... अजिंक्य रहाणे, जो १५ महिन्यांपूर्वी संघाबाहेर गेला होता त्याच्याकडे पुन्हा उप कर्णधारपद दिले गेले... ऋतुराज गायकवाडला कसोटी व वन डे संघात निवडले गेले... यशस्वी जैस्वाललाही कसोटी संघात संधी मिळाली, परंतु रणजी करंडक स्पर्धेच्या मागील तीन हंगामात खोऱ्याने धावा काढणाऱ्या सर्फराज खानवर पुन्हा अन्याय झाल्याची चर्चा सुरूय... आता यात माजी कर्णधार व बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानेही उडी घेतली आहे.
PTI ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, सर्फराज खानला संधी द्यायला हवी होती. त्याने मागील तीन वर्षांत देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्याने धावा केल्या आहेत. अभिमन्यू इश्वरन याच्याबाबतीतही मी हेच म्हणेन. त्यानेही मागील ५-६ वर्षांत दमदार फलंदाजी करून दाखवली आहे. यशस्वी जैस्वालने रणजी करंडक, इराणी ट्रॉफी, दुलिप ट्रॉफीमध्ये शतकं झळकावली आहेत आणि त्यामुळेच तो संघात आहे असे मला वाटते. पण, सर्फराजला संधी मिळायला हवी होती. सर्फराज व अभिमन्यू या दोघांनाही संधी न मिळाल्याचे मला आश्चर्य वाटले, परंतु त्यांना भविष्यात संधी मिळेल. यशस्वी ही चांगली निवड आहे.''
वर्ल्ड कप वेळापत्रकाबाबत...गांगुली म्हणाला, वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक चांगलं आहे. सर्वोत्तम स्टेडियम्सवर सामने होणार आहेत आणि मला खात्री आहे की हा वर्ल्ड कप यशस्वी होईल. मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू येथील स्टेडियम मस्तच आहेत.
तो पुढे म्हणाला,''अजिंक्यला उप कर्णधारपद दिले, याला मी मागे जाणे असे म्हणणार नाही. तो १८ महिने संघाबाहेर होता, त्यानंतर त्याने पुनरागमन केले आणि आता तो उप कर्णधार आहे. पण, या निर्णयमागची प्रोसेल मला कळली नाही. रवींद्र जडेजा बराच कालावधीपासून कसोटी संघात आहे. त्याच्याकडे किंवा दुसर्या कोणाकडे ही जबाबदारी देता आली असती. १८ महिन्यानंतर संघात आल्यावर थेट उप कर्णधार हे पटण्यासारखं नाही. ''