मुंबई - आपण नवी इनिंग सुरू करत असून, त्यासाठी त्यांनी चाहत्यांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन करणारं ट्विट सौरव गांगुली यांनी केल्याने त्यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा मीडिया आणि सोशल मीडियावर रंगली होती. दरम्यान, गांगुलींच्या पोस्टनंतर तर्कवितर्कांना उधाण आलं असतानाच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सौरव गांगुलींनी बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडलेलं नाही, असं स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
सौरव गांगुली यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर जय शाह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सौरव गांगुली यांनी बीसीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे सौरव गांगुली हे बीसीसीआच्या अध्यक्षपदी कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र गांगुलींनी ट्विट करत नेमकी कुठली नवी इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहेत, याची चर्चा मात्र क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी सौरव गांगुली यांनी केलेल्या एका ट्विटमुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली होती. या ट्विटमध्ये गांगुलींनी म्हटले होते की, ट्विटमध्ये लिहिले की, १९९२ मध्ये मी क्रिकेटमधील माझा प्रवास सुरू केला होता. २०२२ मध्ये माझ्या क्रिकेट कारकिर्दीची ३० वर्षे पूर्ण होत आहेत.
तेव्हापासून क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटमुळे तुम्हा सर्वांचा पाठिंबा मला मिळाला आहे. मी प्रत्येक पाठीराख्याचे आभार मानतो. आज मी एक अशी गोष्ट सुरू करण्याची योजना आखत आहे ज्यामुळे अनेक लोकांना फायदा होईल, अशी मला अपेक्षा आहे. माझ्या जीवनातील या नव्या अध्यायामध्ये तुमचा पाठिंबा मला मिळेल, अशी मला अपेक्षा आहे, असे या पोस्टमध्ये गांगुलींनी म्हटले होते. त्यामुळे आता सौरव गांगुली हे क्रिकेट सोडून राजकीय मैदानात नवी इनिंग सुरू करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.