वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रोहित शर्माला ट्वेंटी-२० संघातून वगळले जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. बीसीसीआयने कालच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली, या दौऱ्यावर रोहित शर्माने वन डे व ट्वेंटी-२० मालिकेतून ब्रेक घेतला आहे, मात्र तो कसोटीत कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. पुढील वर्षी जून महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारताला मोजक्याच आंतरराष्ट्रीय मॅच खेळायच्या आहेत, त्यात रोहितने मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती मागितल्याने त्याचे या फॉरमॅटमधील भविष्य काय असेल, ही चिंता चाहत्यांना सतावतेय.
पण, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्या मते रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत असेल तर त्याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपर्यंत संघाचे नेतृत्व करावे. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली म्हणाला, सध्या अनेक खेळाडू संघात खेळत नाहीत, सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व करत आहे, लोकेश राहुल वन डे संघाचा कर्णधार आहे, पण एकदा रोहित शर्माने तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायला सुरुवात केली की, त्याला आणखी एक संधी मिळेल. तो कर्णधार असणे आवश्यक आहे. रोहितने २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली, तो एक नेता आहे. त्यामुळे मला आशा आणि विश्वास आहे की तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपर्यंत टीम इंडियाचा कर्णधार राहील.
विराट कोहली व रोहित हे भारतीय क्रिकेटचे महत्त्वाचे व अविभाज्य भाग आहेत... त्यांनी वन डे वर्ल्ड कपमध्ये अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली आणि आशा करतो की ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्येही ते असाच खेळ करतील. बीसीसीआयने राहुल द्रविड याच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे मला आश्चर्य वाटलेले नाही. त्याला करारात वाढ करायची आहे की नाही, हाच प्रश्न होता. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी भारतीय क्रिकेटसाठी अमुल्य योगदान दिले आहे, परंतु निवड समितीला आला युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे, असेही गांगुली म्हणाला.