नवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी बुधवारी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर टाकलेल्या एका पोस्टने खळबळ माजवली. आपल्या या पोस्टद्वारे गांगुली यांनी, आता पुढे नवीन सुरुवात करणार असल्याचे संकेत दिले. यावरून अनेकांनी गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा तर्क लावला. इतकेच नव्हे, तर सोशल मीडियावरही गांगुलींच्या राजीनाम्याचे वृत्त पसरले. अखेर बीसीसीआय सचिव जय शहा यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. शहा यांनी, गांगुलीने राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर हा गोंधळ संपुष्टात आला.
क्रिकेटमध्ये ३० वर्षे पूर्ण केल्यानंतर आता नवी कारकीर्द सुरु करण्यास इच्छुक आहे. आज मी अशी एक गोष्ट सुरू करण्याची योजना आखत आहे, की माझ्या मते यामुळे खूप साऱ्या लोकांची मदत होईल. मला आशा आहे की, तुम्ही मला तुमचा पाठिंबा कायम राखाल. कारण, मी माझ्या आयुष्याच्या नव्या वळणावर प्रवेश करत आहे.
सौरव गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त अफवा असून यामध्ये काहीच तथ्य नाही. - जय शहा, सचिव, बीसीसीआय
राजकारणाच्या मैदानात उतरणार?
गेल्या वर्षी झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सौरव गांगुली राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यादरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांना रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर या चर्चा अधिक रंगल्या.
‘राजीनामा दिला नाही’ सौरव गांगुली यांनी सांगितले की, 'मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. मी एक जागतिक दर्जाचा एक एज्युकेशन ॲप सुरु करत आहे. बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा वगैरे असं काहीच नाही.'