आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि श्रीलंका आमने-सामने उभे ठाकणार आहेत. तर, भारत आणि पाकिस्तान संघ 28 ऑगस्ट रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये एकमेकांना भिडणार आहेत. यातच, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे दोन खेळाडू बाहेर झाल्याने उर्वरित गोलंदाजांवर चांगल्या कामगिरीची मोठी जबाबदारी असणार आहे. याशिवाय भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीचा फॉर्मदेखील चिंतेचा विषय बनला आहे.
विराट कोहली फॉर्ममध्ये येणे अत्यंत आवश्यक- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचे शतक त्याने जवळपास 3 वर्षांपूर्वी झळकावले होते. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने विराट कोहलीच्या या खराब फॉर्मबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. "विराट कोहलीला केवळ टीम इंडियासाठीच नव्हे, तर स्वतःसाठीही धावा बनविणे अत्यंत आवश्यक आहे."
कोणता संघ ठरणार फेव्हरिट?"भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा केवळ एक सामनाच आहे. जे लोक नियमितपणे खेळतात किंवा जेव्हा मी खेळायचो तेव्हा मी पाकिस्तानविरूद्धचा सामना विशेष मानत नव्हतो. नॉकआऊट सामन्यांमध्ये अतिरिक्त दबाव असतो. पण तसे काही वाटून घ्यायचे नसते. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल हे सर्व अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना दबाव कसा हाताळायचा हे माहित आहे. त्यांच्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही. मात्र जर स्पर्धेतील फेव्हरिट संघाबाबत बोलायचे झाले तर, T20 क्रिकेटमध्ये कोणीही फेव्हरेट संघ नसतो. प्रत्येकजण चांगला संघ असतो आणि ठराविक दिवशी जो संघ चांगला खेळतो तोच संघ जिंकतो", असे रोखठोक मतही गांगुलीने व्यक्त केले आहे.