नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आगामी आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगची उचलबांगडी होणार असून क्रिकेटच्या 'दादां'ची प्रशिक्षकपदी वर्णी लागणार आहे. आयपीएलचा सोळावा हंगाम दिल्लीच्या संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्लीला आपल्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.
'संगबाद प्रतिदिन' या बंगाली वृत्तपत्रातील वृत्तानुसार, सौरव गांगुली दिल्लीच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहेत. तसेच ते दिल्लीच्या फ्रँचायझीमध्ये संघाचे संचालक म्हणून देखील कार्यरत राहणार आहेत.
२ वर्षांपासून दिल्लीची घसरगुंडीदरम्यान, त्यामुळे आगामी हंगामात प्रशिक्षकपदावरून रिकी पाँटिंगची उचलबांगडी होणार असल्यातचे दिसते. ऑस्ट्रेलियन दिग्गज २०१८ मध्ये दिल्लीच्या संघात सामील झाला होता. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीचा संघ २०२० मध्ये अंतिम फेरीत पोहचला होता. तसेच २०२१ च्या हंगामात देखील दिल्लीच्या संघाने चमकदार कामगिरी केली होती. पण मागील दोन हंगामापासून दिल्लीचा संघ आपली जादू दाखवण्यात अपयशी ठरला आहे. २०२२ मध्ये, DC पाचव्या स्थानावर राहिला, तर २०२३ मध्ये, DC गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिगच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात दिल्लीच्या संघाने उभारी घेतली. पण मागील दोन हंगामात दिल्लीला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. यंदाच्या आयपीएल हंगामात डेव्हिड वॉर्नर वगळता कोणत्याच फलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नाही.