Sourav Ganguly 125 crore deal Bigg Boss Bangla: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची नुकतीच ICC मेन्स क्रिकेट कमिटीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली. त्याचसोबत एका खास कारणामुळे गांगुली पुन्हा चर्चेत आला आहे. एका रिपोर्टनुसार, सौरव गांगुलीने एक टीव्ही शो संदर्भात एक नवा करार केला आहे, ज्यासाठी त्याला तब्बल १२५ कोटी रुपये दिले जाणार आहे. झी बांगलाच्या 'दादागिरी' या शोमुळे अँकर म्हणून लोकप्रिय झालेला सौरव गांगुली आता बिग बॉस बांगलासाठी अँकरिंग करताना दिसणार आहे.
बंगाली टेलिव्हिजनवर 'दादागिरी' हा क्विझ शो होस्ट केल्यानंतर सौरव गांगुली अँकर म्हणून प्रसिद्ध झाला. न्यूज १८ बांगलाच्या अहवालानुसार, 'स्टार जलशा' वाहिनी त्याच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेऊ इच्छित आहे. म्हणूनच त्यांनी सौरव गांगुलीसोबत १२५ कोटी रुपयांचा ४ वर्षांचा करार केला आहे. त्या बदल्यात गांगुली बिग बॉस बांगला होस्ट करेल असे बोलले जात आहे. चॅनेल एक नवीन क्विझ शो देखील आणणार आहे. हे दोन्ही शो पुढील वर्षीपासून प्रसारित होतील. त्याच्या निर्मितीचे काम जुलै २०२५ पासून सुरू होईल.
अहवालानुसार, सौरव गांगुलीने त्याच्या नवीन करारावर आनंदी असल्याचे म्हटले आहे. स्टार जलशाशी करारबद्ध झाल्याने तो आनंदी आहे. तो आणि स्टार जलशा मिळून एक नवीन इनिंग सुरू करत आहेत, ज्यात नॉन-फिक्शन कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे गांगुली म्हणाला आहे. मला नेहमीच क्रिकेट क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रांशी संबंधित असलेल्या लोकांशी संपर्क साधायला आवडते. स्टार जलशासोबत मला ती संधी मिळेल. मला अशा लोकांच्या जीवनातील कथा जाणून घेता येतील, ज्याचा लोकांवर प्रभाव पडेल, असे गांगुलीने सांगितले आहे.