भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीनं काल पत्रकार परिषदेत त्याला वनडे संघाचं कर्णधारपद सोडण्याची माहिती संघ जाहीर करण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी देण्यात आल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कोहलीच्या दाव्यानं बीसीसीआय त्याच्यावर नाराज असल्याची माहिती आता समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होण्याआधी कोहलीनं पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीवर गदारोळ उडाला आहे. कोहलीच्या वक्तव्यांमुळे आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. विराटला ट्वेन्टी-२० संघाचं कर्णधारपद न सोडण्याचा सल्ला दिला होता पण तो ऐकला नाही, असं विधान सौरव गांगलीनं केलं होतं.
कोहलीनं मात्र पत्रकार परिषदेत सर्व दावे फेटाळून लावले. कोहलीनं थेट बीसीसीआयच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यासोबतच गांगुली यांच्याकडून खोटा दावा केला जात असल्याचंही कोहलीनं म्हटलं. याच दरम्यान पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याआधी बीसीसीआयनं कोहलीशी चर्चा केली होती अशी माहिती समोर येत आहे. एका बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. या बैठकीला एकूण ९ जण उपस्थित होते. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं केलेल्या दाव्यानुसार ट्वेन्टी-२० संघाचं कर्णधारपद सोडणं योग्य वाटतं का? असा प्रश्न विराट कोहलीला विचारण्यात आला होता. या बैठकीला ९ जण उपस्थित होते. यात पाच निवडसमितीचे सदस्य, अध्यक्ष सौरव गांगली, सचिव जय शाह, कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील उपस्थित होता.
कोहलीच्या निर्णयानं बीसीसीआयला धक्काकोहलीसोबतची संबंधित बैठक आयपीएल-२०२१ च्या दुसऱ्या टप्प्यावेळी यूएईमध्ये झाली होती. यात सर्वजण व्हर्च्युअल पद्धतीनं सहभागी झाले होते. दरम्यान, या बैठकीवेळी कोहली ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेआधीच कर्णधारपद सोडेल याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. त्यामुळेच कोहलीनं ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्त्व सोडणार असल्याचं जाहीर केल्यानंतर बीसीसीआयला धक्का बसला होता. कोहलीनं त्यावेळी वर्कलोड मॅनेजमेंटचं कारण देत ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होणार असल्याचं जाहीर केलं होतं.
कोहलीच्या वक्तव्यानं गांगुली नाराजपीटीआयच्या वृत्तानुसार विराट कोहलीनं कालच्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावर बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. पण बोर्डाच्या अध्यक्ष या नात्यानं बहुमतानं निर्णय घेण्याचा गांगुलीची भूमिका असणार आहे. बोर्डाच्या एका अनुभवी अधिकाऱ्यानं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, "बीसीसीआयसाठी हे अत्यंत कठीण प्रकरण आहे. जर बोर्डानं आपली बाजू जाहीर केली तर कर्णधार खोटा ठरेल आणि कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. तर अध्यक्ष सौरव गांगुलीबाबत प्रश्न उपस्थित केले जातील. कोहलीच्या वक्तव्यामुळे बोर्डाचं मोठं नुकसान झालं आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संवादाची कमतरता आता स्पष्टपणे दिसू लागली आहे"