मुंबई : बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी बरेच राजकारण झाले, पण त्यामध्ये अखेर बाजी मारली ती भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने. जेव्हा ही खलबत सुरु होती तेव्हा गांगुलीला उपाध्यक्षपद देण्यात आले होते. पण तिथून तो थेट अध्यक्ष झाला. ही जादूची कांडी नेमकी फिरली तरी कशी, याची उत्सुकता साऱ्यांना आहे.
बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी ब्रिजेश पटेल, यांचे नाव सुचवले होते आणि ते आपल्या मतावर ठाम होते.
ब्रिजेश पटेल यांचे नाव अध्यक्षपदासाठी खमके उमेदवार असल्याचे मानले जात होते. त्यावेळी त्यांच्यासमोर कोणाला उभे करायचे, हा प्रश्न त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना पडला होता. त्यावेळी सौरव गांगुलीचे नाव या शर्यतीमध्ये आणले गेले. त्यावेळी श्रीनिवासन यांच्या गटाने आपली मागणी जोर लावून धरली होती, त्यांना ब्रिजेश पटेल यांनाच अध्यक्षपदावर बसवायचे होते. पण जेव्हा गांगुलीचे नाव आले तेव्हा त्याला उपाध्यक्षपद देऊ या, अशी खेळी श्रीनिवासन यांच्याकडून करण्यात आली. शेरावर सव्वाशेर असतो, या गोष्टीचा प्रत्यय यावेळी आला.
गांगुलीला उपाध्यक्ष करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या होत्या. पण यावेळी बीसीसीआयचे माजी पदाधिकारी अनुराग ठाकूर यांनी एक पाऊल पुढे टाकले. या बैठकीमध्ये त्यांनी सांगितले की, " गांगुलीला बीसीसीआयचे अध्यक्षपद द्यायचे आहे. एका मोठ्या नेत्याची ही मागणी आहे."
ठाकूर यांनी जेव्हा या नेत्याचे नाव सांगितले तेव्हा त्यांचे राजकीय वजन पाहता एन. श्रीनिवासन यांचा विरोध मावळला. कारण गांगुलीला अध्यक्ष बनवयाचे मत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. पण एका मोठ्या नेत्याने आपले वजन वापरून गांगुलीचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा केल्याचे म्हटले जात आहे.