नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य असलेला गांगुली इंडियन प्रीमिअर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागारही आहे. त्यामुळे बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी लोकपाल डी. के. जैन यांच्याकडे गांगुलीच्या दुहेरी भूमिकेचा तपास घेण्यास सांगितले होते. हितसंबंध जपण्याच्या कारवाईतून वाचण्यासाठी गांगुलीने सल्लागार समितीतून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
गांगुली हा बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. गांगुलीनं सल्लागार समितीतून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. या समितीत व्हीव्हीएस लक्ष्मण आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचाही समावेश आहे.
''2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्यावेळी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड करताना झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत गांगुलीने शेवटची हजेरी लावली होती. मुख्य म्हणजे त्यानंतर सल्लागार समितीची एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे हितसंबंध जपण्याचा वाद टाळण्यासाठी गांगुली या समितीतून राजीनामा देण्याच्या तयारीत आहे,''अशी माहिती सुत्रांनी दिली.