नवी दिल्ली : बीसीसीआयने (BCCI) सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यास नकार दिला आहे. 1983 च्या विश्व चॅम्पियन संघाचे सदस्य रॉजर बिन्नी हे भारतीय क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष असणार आहेत. तर बीसीसीआयचे सचिव जय शाह त्यांच्या पदावर कायम राहणार आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये अध्यक्ष बनलेल्या दादांची इच्छा होती की, त्यांनी आणखी एक टर्म पूर्ण करावी. पण हे होऊ शकले नाही. त्यांच्या या स्वप्नाला संचालक मंडळाच्या बैठकीत विरोध करण्यात आला. तसेच त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले. सौरव गांगुली आता एकाकी पडले असून अशीच काहीशी स्थिती मागील वर्षी विराट कोहलीची झाली होती.
तेव्हा विराटला सोडावे लागले होते कर्णधारपद सौरव गांगुली यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील सर्वात मोठा वाद 2021 मध्ये झाला होता. भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीसोबत दादांच्या मतभेदाच्या बातम्या आल्या होत्या. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार होता. अशातच विराट कोहलीच्या जागी अचानक रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. माहितीनुसार, टी-20 संघाचे कर्णधारपद सोडताना कोहलीने एकदिवसीय आणि कसोटी संघांचे कर्णधारपद कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु बीसीसीआयला व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये संघाचा एकच कर्णधार हवा होता. त्यामुळे कोहलीकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद हिरावून घेण्यात आले. त्यानंतर बोर्डाने याबाबत कोहलीशी बोलले होते, असे सांगण्यात आले, पण कोहलीने याबाबत स्पष्ट बोलणे टाळले आहे. मात्र या दौऱ्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले.
सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहण्यास इच्छुक होते. परंतु बोर्डाच्या अध्यक्षपदाबाबत ही प्रथा नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. खरं तर सौरव गांगुली आणि जयेश जॉर्ज वगळता बीसीसीआयच्या मुख्य संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणखी एक संधी मिळाली आहे. 11 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "सौरव अस्वस्थ दिसत होता. तो निराशही होता. नामांकन प्रक्रिया संपल्यानंतर ऑफिसमधून बाहेर पडणारा तो शेवटचा व्यक्ती होता. तो पटकन जाऊन त्याच्या गाडीत बसला. खिडकीच्या काचा बंद करून तो निघून गेला."
चुकीच्या ब्रॅंडचे समर्थन केल्याचा आरोप दरम्यान, नामांकनाच्या दिवसापूर्वी झालेल्या अनौपचारिक बैठकांमध्ये गांगुलींना सांगण्यात आले की, त्यांची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे बीसीसीआय टीमचे मार्गदर्शक एन. श्रीनिवासन हे गांगुली यांच्या मुख्य टीकाकारांपैकी एक होते. दादांवर असा आरोप झाला आहे की, त्यांनी अशा ब्रॅंडचे समर्थन केले आहे, जे बीसीसीआयच्या अधिकृत स्पॉन्सरचे प्रतिस्पर्धी आहेत.