नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटच्या देदीप्यमान वाटचालीमध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांचे स्थान सर्वोच्च स्थानांपैकी एक आहे. भारतीय क्रिकेटला मॅच फिक्सिंगच्या दलदलीतून बाहेर काढण्यात या दोघांचे योगदान न विसरण्यासारखे आहे. भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये सौरव गांगुली आघाडीवर असून, ८ जुलैला तो आयुष्याचे अर्धशतक पूर्ण करणार आहे. आपल्या जिवाभावाच्या मित्राला आणि सर्वोत्तम कर्णधाराला शुभेच्छा देताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने , 'सौरव महान कर्णधार होता,' असे म्हटले.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असलेल्या सौरवने शुक्रवारी वयाची ५० वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या सलामी जोडीदारासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिल्या. सचिन म्हणाला की, 'सौरव महान कर्णधार होता. संघाचे संतुलन कसे राखावे, हे त्याला माहीत होते. तसेच, खेळाडूंना किती मोकळीक द्यावी आणि किती जबाबदारी द्यावी, हेही त्याला माहीत होते. जेव्हा त्याने संघाचे कर्णधारपद सांभाळले, तेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये अनेक बदल घडत होते.
भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जातील, अशा खेळाडूंची आम्हाला गरज होती.' सचिनने पुढे म्हटले की, 'त्या वेळी आम्हाला वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग आणि आशिष नेहरा यांच्यासारखे जागतिक दर्जाचे खेळाडू लाभले. हे सर्व गुणवान होते, पण त्यांना कारकिर्दीच्या सुरुवातीला सहकार्याची मदत पाहिजे होती आणि ही मदत गांगुलीने केली. या सर्वांना आपल्याप्रमाणे खेळण्याची मोकळीक मिळाली होती.'
पुढील कर्णधार सौरवच होताभारताच्या १९९९ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानच सचिनने संघाचा पुढील कर्णधार सौरवच असणार हे निश्चित केले होते. सचिनने सांगितले की, 'कर्णधारपद सोडण्याआधी मी, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सौरवला उपकर्णधार नेमण्याचा सल्ला दिला होता. मी त्याला जवळून पाहिले असून त्याच्यासोबत बरेच क्रिकेट खेळलेलो. भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याची त्याच्यात क्षमता असल्याचे मला माहीत होते. तो चांगला कर्णधार होता. यानंतर सौरवने कधी मागे वळून पाहिले नाही आणि पुढील सर्व यश आपल्यासमोर आहे.'
मोबाईल नसताना मैत्री घट्ट झालीसचिनने जुन्या आठवणींना उजाळा देताना म्हटले की, '१९९१च्या दौऱ्यात आम्ही एकाच रुममध्ये राहत होतो आणि आम्ही खूप मस्तीही केली आहे. १५ वर्षांखालील गटाचे क्रिकेट खेळत असल्यापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. त्यावेळी मोबाईल फोन नसल्याने आम्ही सातत्याने संपर्कात राहिलो नाही, पण मैत्री अधिक घट्ट झाली.