लखनौ : दक्षिण आफ्रिकेला २ चेंडूंमध्ये ६ धावांची आवश्यकता असताना अरुंधती रेड्डीने टाकेलेला नो बॉल भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने ६ गड्यांनी बाजी मारत भारताच्या हातातील विजय हिसकावून नेला. यासह तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताने केवळ एक अवांतर धाव दिली आणि हीच धाव निर्णायक ठरली.
भारताने २० षटकांत ४ बाद १५८ धावा केल्यानंतर आफ्रिकेने २० षटकांत ४ बाद १५९ धावा केल्या. लिझेल लीने ४५ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह ७० धावांचा तडाखा दिला. लॉरा वॉलवार्डने ३९ चेंडूंत सात चौकारांसह नाबाद ५३ धावा करत संघाला विजयी केले. ली हिला बाद करत भारताने पुनरागमन केले, मात्र अखेरच्या षटकात आफ्रिकेला नऊ धावांची गरज असताना अरुंधतीकडून झालेली चूक महागात पडली.
त्याआधी, युवा शेफाली वर्मा व रिचा घोष यांनी आक्रमक फटकेबाजी केली. कर्णधार स्मृती मानधना दुसऱ्याच षटकात बाद झाल्यानंतर शेफालीने नैसर्गिक खेळ करत.३१ चेंडूंत ६ चौकार व दोन षटकारांसह ४७ धावांचा तडाखा दिला. हरलीन देओलने (३१) शेफालीला चांगली साथ देत दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. रिचा घोषने २६ चेंडूंत आठ चौकारांसह नाबाद ४४ धावांची फटकेबाजी केल्याने भारताने समाधानकारक मजल मारली.