वर्ल्डकपच्या शेवटच्या साखळी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 10 धावांनी मात केली आहे. यामुळे भारताने गुणतक्त्यामध्ये पहिले स्थान पटकाविले असून सेमीफायनलमधील सामनाही कोणत्या संघासोबत होणार हे पक्के झाले आहे.
आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 325 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शेवटच्या ओव्हरपर्यंत कडवी झुंझ देत 315 धावांवर ऑलआऊट झाली. यामुळे आजच्या भारत-श्रीलंका सामन्यात श्रीलंकेवर सात गड्यांनी विजय मिळवत भारताने गुणतक्त्यामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा दुसरा क्रमांक आहे.
यामुळे भारताचा सेमीफायनलमध्ये सामना 9 जुलैला निश्चित झाला असून चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडसोबत पुन्हा टक्कर होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाची टक्कर यजमान इग्लंडसोबत होणार आहे. हा सामना 11 जुलै रोजी खेळविला जाणार आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या डेव्हिड वॉर्नरने शतकी पारी खेळत 122 धावांचे योगदान दिले. वॉर्नरला अॅलेक्स कॅरीने चांगली साथ देत 85 धावा केल्या. विजय दृष्टीपथात असल्याचे दिसत असताना वॉर्नरनंतर कॅरीही बाद झाला. यानंतर आलेल्या मायकल स्टार्कने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला विजयासमीप आणले. मात्र, झटपट विकेट पडल्याने ऑस्ट्रेलिया 49.5 ओव्हरमध्ये 315 धावांवर ऑलआऊट झाली.
यापूर्वी 13 जूनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. यामुळे वर्ल्डकपमधील ही या दोन संघांमधील पहिलीच लढत असणार आहे.
Web Title: South Africa beat Australia; India will face semi-finals with new zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.