Join us  

दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय; मालिकेत केली 1-1 अशी बरोबरी

दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 6:49 PM

Open in App
ठळक मुद्देसामन्यात एकूण 11 बळी मिळवणाऱ्या रबाडाला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

पोर्ट एलिझाबेथ : क्रिकेट जगताचे ज्या कसोटी मालिकेकडे लक्ष लागून राहिले आहे, त्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. सामन्यात एकूण 11 बळी मिळवणाऱ्या रबाडाला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सोमवारी 5 बाद 180 या धावसंख्येवरून ऑस्ट्रेलियाने दिवसाची सुरुवात केली. मिचेल मार्श (45) आणि टीम पेन (नाबाद 28) यांनी काही काळ  दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा थोडाफार प्रतिकार केला. पण रबाडाच्या वेगवान गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची डाळ शिजली नाही. मार्शला बाद करत रबाडाने ही जोडी फोडली. त्यानंतर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनाही बाद करत रबाडाने ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला वेसण घातले. टीमने अखेरपर्यंक ऑस्ट्रेलियाचा किल्ला लढवला खरा, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 239 धावांमध्ये संपुष्टात आला. रबाडाने या डावात ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी 101 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला चार फलंदाज गमावावे लागले, पण त्यांनी हे आव्हान पूर्ण करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. एबी डीव्हिलियर्स (28) आणि हशिम अमला (27) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात योगदान दिले.

टॅग्स :क्रिकेटआॅस्ट्रेलियाद. आफ्रिका