नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाला सुरूवात झाली आहे. सध्या या स्पर्धेतील सराव सामन्यांचा थरार रंगला आहे. आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने 9 गडी राखून मोठा विजय मिळवला. न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 98 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात आफ्रिकेच्या संघाने केवळ 1 गडी गमावून या सोप्या आव्हानाचा पाठलाग केला. न्यूझीलंडच्या कोणत्याच फलंदाजाला वैयक्तिक 30 धावांचा आकडा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमक गोलंदाजीसमोर किवी फलंदाज गारद झाले. केशव महाराजने सर्वाधिक 3 बळी पटकावून आफ्रिकेला मजबूत स्थितीत पोहचवले.
तत्पुर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून किवी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडला संघाच्या अवघ्या 6 धावा असताना पहिला झटका बसला. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या कोणत्याच फलंदाजाला खेळपट्टीवर जास्त वेळ टिकून दिले नाही. अखेर 17.1 षटकांत न्यूझीलंडचा संघ अवघ्या 98 धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून अष्टपैलू केशव महाराजने सर्वाधिक 3 बळी पटकावले. तबरेझ शम्सी आणि वेन पार्नेल यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर मार्को जॅन्सन, एडन मार्कराम आणि कगिसो रबाडा यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.
न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरूवात शानदार झाली. सलामीवीर रीझा हेंड्रिक्स आणि रिले रोसो यांनी शानदार खेळी केली. रोसोने नाबाद 54 धावांची अर्धशतकी खेळी करून आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. खरं तर आजच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार टेम्बा बवुमाला विश्रांती देण्यात आली होती. बवुमाच्या गैरहजेरीत आफ्रिकेच्या संघाची धुरा डेव्हिड मिलरच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती.
आगामी सराव सामने खालीलप्रमाणे
17 ऑक्टोंबर -भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियान्यूझीलंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका इंग्लंड विरूद्ध पाकिस्तानअफगाणिस्तान विरूद्ध बांगलादेश
19 ऑक्टोंबर -अफगाणिस्तान विरूद्ध पाकिस्तान बागंलादेश विरूद्ध दक्षिण आफ्रिका भारत विरूद्ध न्यूझीलंड
टी-20 विश्वचषकात सुपर-12 पूर्वी आठ संघांमध्ये सामने खेळवले जातील. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-12 सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील.
पहिला राउंड अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.
ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे.
सुपर-12 फेरीगट 1 - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.
गट 2 - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"