Join us  

दुसऱ्या कसोटीत द.आफ्रिकेचा न्यूझीलंडवर शानदार विजय

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला १९८ धावांनी नमवून शानदार विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 9:48 AM

Open in App

ख्राईस्टचर्च : दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला १९८ धावांनी नमवून शानदार विजयाची नोंद केली, शिवाय मालिकेत १-१ अशी बरोबरीही साधली. न्यूझीलंडला ४२६ धावांचे लक्ष्य मिळाले होते. हा संघ २२७ धावांत गारद झाला. न्यूझीलंडने पहिली कसोटी एक डाव २७६ धावांनी जिंकली होती.  त्या सामन्यात द. आफ्रिका संघ ९५ आणि १११ धावांत बाद झाला होता.

द. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतल्यानंतर पाचही दिवस वर्चस्व गाजविले. क्विंटन डिकॉकच्या अचानक निवृत्तीनंतर फलंदाजीची जबाबदारी सांभाळणारा यष्टिरक्षक कार्ल व्हेरेन याने नाबाद १३६ धावा केल्याने आफ्रिकेने दुसरा डाव ९ बाद ३५४ धावांवर घोषित केला होता. न्यूझीलंडने द. आफ्रिकेविरुद्ध ८९ वर्षांत आतापर्यंत एकही मालिका जिंकलेली नाही. १९३२ पासून उभय संघांदरम्यान ४७ सामने खेळले गेले. त्यात न्यूझीलंडने केवळ पाच जिंकले.

चौथ्या दिवशी कर्णधार टॉम लॅथम १, विल यंग ००, हेन्री निकोल्स ७, डेरिल मिचेल २४ हे लवकर माघारी परतले. डेवोन कॉन्वे ६० धावांवर नाबाद होता. ४ बाद ६४ वरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडकडून  आज कॉन्वेने सर्वाधिक ९२, तर टॉम ब्लाँडेलने ४४ धावा केल्या. द. आफ्रिकेकडून रबाडा, येन्सेन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी तीन-तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

द. आफ्रिका : ३६४ आणि ९ बाद ३५४ वर डाव घोषित. (काईन व्हेरेन नाबाद १३६,कागिसो रबाडा ४५, रॉसी वान डेर दुसेन ४५) न्यूझीलंड : पहिला डाव ८० षटकात २९३ आणि दुसरा डाव: ९३.५ षटकात २२७ धावा.(डेवोन कॉनवे ९२, टॉम ब्लंडेल ४४, डेरिल मिचेल २४) गोलंदाजी: रबाडा ३-४६, मार्को जेन्सेन ३-६३,केशव महाराज ३-७५.

टॅग्स :द. आफ्रिकान्यूझीलंड
Open in App